वाचनाचा छंद हा विचार आत्मसात करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात आहे. पुस्तकांच्या मैत्रीतून जगण्याला बळ मिळत असते. व्हॉट्सअ‍ॅप, इंटरनेट माध्यमाचा सकारात्मक वापर करा व त्यातून समृद्ध होण्याचा सल्ला येथील यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी दिला. यशवंतराव चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय आणि विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटय़ूट यांच्या वतीने वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. कलाम यांनी भारताला, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात आव्हाने पेलण्याची शक्ती दिली. विज्ञानाचा वापर सकारात्मकपणे करण्यासाठी मानसिकता बदलण्याचेही त्यांनी सांगितले. पुस्तकांची मैत्री जन्मभर पुरणारी असते. थोर महापुरुषांचे विचार समाजाला जडणघडण करण्यासाठी उपयुक्त असतात, असेही ते म्हणाले. या वेळी ठाकूर यांनी आवडलेल्या काही पुस्तकांविषयी अनुभवकथन केले. वाचकांनी पुस्तकांविषयी माहिती जाणून घेतली. या प्रसंगी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेचे विनायक रानडे, छायाचित्रकार अभय ओझरकर, नाटय़ कलावंत पल्लवी पटवर्धन, लक्ष्मी पिंपळे, उपस्थित होते.

सोनवणे महाविद्यालय
सटाणा येथील सोनवणे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन प्राचार्य डॉ. किशोर पवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. ‘वाचनाचे महत्त्व’ या विषयावर डॉ. पवार यांनी जो चांगले वाचन करू शकतो तोच चांगले लिहू शकतो, बोलू शकतो, असे मांडले. समाजात सक्षमपणे उभे राहण्यासाठी व आपली विचारशक्ती प्रगल्भ करण्यासाठी त्याला वाचनाची गरज आहे. डॉ. अब्दुल कलाम हे वैज्ञानिक असूनही त्यांच्यात आध्यात्मिक दृष्टिकोन होता. प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करून आपण ठरविलेली स्वप्न पूर्ण करू शकतो, असे डॉ. कलामांनी सिद्ध करून दाखवल्याचे पवार यांनी नमूद केले. या वेळी वाचन विषयावर चांगले बोलणाऱ्या विद्यार्थ्यांना पवार लिखित ३० पुस्तकांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक उपप्राचार्य के. एस. पाटील यांनी केले. या वेळी देवेंद्र वाघ उपस्थित होते.

सीडीओ मेरी शाळा
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सीडीओ मेरी शाळेत वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात निवेदक ऋषिकेश आयाचित यांनी मार्गदर्शन केले. वाचनामुळे आपणास विविध विषयांची ओळख होत असल्याने प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान सहज मिळते. कुठल्याही क्षेत्रात आपणास यशस्वी व्हावयाचे असेल तर सखोलपणे वाचन केले पाहिजे, असे आवाहन आयाचित यांनी केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक यादव आगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक मंडळ अध्यक्ष राजेंद्र निकम, शिक्षक प्रतिनिधी तथा मराठी विभाग व वाड्मय मंडळ प्रमुख दिलीप अहिरे, उपमुख्याध्यापिका आशा डावरे, पर्यवेक्षक कृष्णा राऊत, मुग्धा काळकर, आदी उपस्थित होते. प्रास्तविक मोहिनी तुरेकर यांनी केले. प्राथमिक विभागाच्या शालिनी बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी निकम आणि सुनीता वाईकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन नीलिमा कांबळे यांनी केले. आरती ठकार यांनी आभार मानले.

बिटको गर्ल्स स्कुल
वाचन प्रेरणा दिन बिटको गर्ल्स हायस्कूल शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका आर. आर. काळे, उपमुख्याध्यापक पी. पी. रायजादे आदी उपस्थित होते. याप्रसंगी काळे यांनी वाचल्याशिवाय गत्यंतर नसल्याचे नमूद केले. जगण्याचे खरे ज्ञान साहित्यातून, ग्रंथातून मिळते. डॉ. कलाम हे स्वत: विज्ञानतज्ज्ञ होते, तरीही वाङ्मयाकडे त्यांचा ओढा होता हे विशेष होय, असेही त्यांनी सांगितले. या वेळी प्रत्येक वर्गात गोष्टीची पुस्तके देऊन वाचन प्रेरणा दिन म्हणून वाचन करून घेण्यात आले. काही वर्गात तर वृत्तपत्रांमधील डॉ. कलामांचे लेख वाचून घेण्यात आले.

वावरे महाविद्यालय
सिडकोतील वावरे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात नगरसेविका अश्विनी बोरस्ते यांनी वाचन माणसाला सतत प्रबोधन करते, हे सांगून डॉ. अब्दुल कलामांचे विचार आणि कार्य स्पष्ट केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. जी. वाघ होते. वाघ यांनी, विद्यार्थ्यांनी रोज वाचावे. मोठमोठय़ा नेत्यांची चरित्रे, त्यांचे कार्य ग्रंथातून समजावून घेण्याचा सल्ला दिला. डॉ. वेदश्री थिगळे यांनी डॉ. अब्दुल कलामांचे विचार स्पष्ट केले. प्रा. एन. एम. शिंदे यांनी डॉ. अब्दुल कलामांची माहिती दिली. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने कोमल दाभाडे, आकाश, महेश देसले, हेमंत जोशी, स्वाती घारगे, गौरी गगभनिढे आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. शिंदे, प्रा. बी. बी. कुटे उपस्थित होते. डॉ. कलाम यांची पुस्तके वाचण्यासाठी देण्यात आली.

सुभाष वाचनालय
डॉ. अब्दुल कलाम यांचे कार्य देशाला गौरवास्पद असल्याचे उद्गार सामाजिक कार्यकर्ते शरद जहागीरदार आहेरगांवकर यांनी काढले. जुने नाशिक परिसरातील सुभाष सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ‘वाचन प्रेरणा दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आबासाहेब पवार-पाटील होते. वाचनालयात ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन शरद जहागीरदार यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक वाचनालयाचे ग्रंथपाल दत्ता पगार यांनी केले. त्यांनी मार्गदर्शनही केले. वाचनालयाचे कार्याध्यक्ष परमानंद पाटील यांच्या हस्ते जहागीरदार यांचा, तर उपकार्याध्यक्ष प्रभाकर खंदारे यांच्या हस्ते आबासाहेब पवार यांचा सत्कार करण्यात आला. आभार वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह मारुती तांबे यांनी मानले.