युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे ११ मार्च रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीत नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यात केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत २९ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
खा. हेमंत गोडसे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे संबंधित कामांना निधी मंजूर झाला असून, या कामांच्या भूमिपूजनासाठी आदित्य ठाकरे यांचे पाथर्डी फाटा येथे शुक्रवारी सकाळी १० वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर अंजनेरी येथे पुरातत्त्व विभागाकडून १६ हेमाडपंथी मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी मंजूर झालेल्या १६ कोटी ९५ लाख रुपयांच्या कामास साडेदहा वाजता सुरुवात करण्यात येणार आहे.
तसेच पाच कोटी ५६ लाख रुपये मंजूर झालेल्या द्वारका ते दत्तमंदिर सिग्नल महामार्ग डांबरीकरणाच्या कामास साडेअकरा वाजता आणि त्यानंतर सहा कोटी ७५ लाख रुपये मंजूर झालेल्या जेलरोड येथील आढावनगरात बंदिस्त क्रीडा संकुलाचे भूमिपूजन दुपारी १२ वाजता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमांना सहकार राज्यमंत्री दादा भुसे, संपर्क नेते अजय चौधरी, आ. योगेश घोलप, आ. राजाभाऊ वाजे, आ. अनिल कदम, उपनेते बबन घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.