करोना स्थितीचा आदित्य ठाकरे यांच्याकडून आढावा

नाशिक : शहरातील करोना स्थितीचा आढावा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेण्यास २४ तास उलटण्याच्या आत राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला देखील त्याची गरज भासली. दैनंदिन २०० ते २२५ रुग्णांची भर पडत असतांना फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर राज्य सरकार अकस्मात जागे झाल्याचे पहायला मिळाले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधत करोना स्थितीचा आढावा घेतला.

विरोधी पक्षनेते फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे सध्या राज्याचा दौरा करून करोना स्थितीचा आढावा घेत आहेत. त्या अंतर्गत बुधवारी उभयतांनी नाशिकचा दौरा केला. जिल्हा शासकीय रुग्णालय, नाशिकरोडस्थित बिटको येथील करोना विलगीकरण केंद्रास भेट दिली. वैद्यकीय अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हधिकारी, पालिका आयुक्तांशी विविध मुद्यांवर चर्चा केली.

नाशिक शहर हे सध्या गंभीर टप्प्यावर आहे. रुग्णसंख्या वाढत असून त्याचे योग्य व्यवस्थापन करायला हवे. शहरात आक्रमकपणे मोठय़ा प्रमाणात चाचण्या करण्याची गरज आहे. राज्य सरकारने महापालिकेला केवळ २० लाखाचा निधी दिला. करोना लढाईत महापालिकांना मोठय़ा प्रमाणात अनुदान द्यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली होती.

भाजप नेत्यांच्या दौऱ्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार खडबडून जागे झाल्याचे पाहायला मिळाले. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. याआधी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि कृषिमंत्री दादा भुसे यांनी शहरातील स्थितीचा आढावा घेतला होता. विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दृकश्राव्य माध्यमातून पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी संवाद साधून स्थिती जाणून घेतली. गमे यांनी विविध उपाययोजनांबाबत माहिती दिली. यावेळी ठाकरे यांनी विविध सूचना दिल्या. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधण्याचे काम महापालिका चांगल्याप्रकारे करीत आहे. महापालिकेने तपासण्यांची संख्या वाढविल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने खाटांची क्षमता वाढवली ती पुरेशी आहे. यामुळे रुग्णांना कुठल्याही अडचणी निर्माण होत नसल्याचा दाखला त्यांनी दिला.

करोनाबाबत माहितीचे व्यवस्थापन, त्याचे विश्लेषण आणि तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यायला हवा. शासन स्तरावरून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ऑक्सिजन तपासणी यंत्रणा, व्हेंटिलेटर, रुग्णवाहिका आदी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

उशिरा सुचलेले शहाणपण..

विरोधी पक्षनेत्यांच्या दौऱ्यानंतर राज्य सरकारला आढावा घेण्याची आवश्यकता भासली. उशिराने सुचलेले हे शहाणपण आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारकडून  राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठय़ा प्रमाणात निधी मिळाला. पण राज्य शासनाने तो महापालिकेला दिला नाही. नाशिक महापालिकेला अतिशय तुटपुंजे अनुदान मिळाले. राज्य सरकारने दुजाभाव न करता महापालिकेला निधी द्यायला हवा. करोनावर प्रभावी ठरणाऱ्या औषधांची उपलब्धता करण्याची जबाबदारी सरकारने स्वीकारायला हवी. काही महत्वाच्या औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते. सरकारने मोठय़ा प्रमाणात खरेदी करून त्यांची शहर, जिल्हा पातळीवर उपलब्धता केल्यास रुग्णांच्या नातेवाईकांची फरपट थांबू शकेल.

– प्रा. देवयानी फरांदे (आमदार, भाजप)

पूजा सुरू करू द्यावी

११० दिवसांपासून त्र्यंबक देवस्थान बंद आहे. त्र्यंबकमध्ये होणारे धार्मिक विधी बंद आहेत. पुरोहितांकडून किमान दिवसाला एका पूजेची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच मंदिर स्थानिकांना दर्शनासाठी खुले करणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रावणातील पिढय़ान् पिढय़ा सुरू असलेल्या परंपरा जपल्या जातील. याबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

– प्रशांत गायधनी (त्र्यंबक पुरोहित संघ)