शिवसेना केवळ बोलून दाखवत नाही, तर करून दाखविते असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. नाशिकरोड येथे बंदिस्त क्रीडा संकुलाचे भूमिपूजन, अंजनेरी येथे १६ हेमाडपंथीय मंदिराच्या मंदिरांचे नूतनीकरण आणि द्वारका ते दत्तमंदिर दरम्यानच्या महामार्गाचे डांबरीकरण या कामांचा शुभारंभ शुक्रवारी ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. द्वारका चौकात सेनेच्या युवराजांचे आगमन वाहनधारक व स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले. या कार्यक्रमामुळे अर्धा तास द्वारका चौकातील वाहतूक थांबविण्यात आली. परिणामी, मुंबई-आग्रा महामार्ग तसेच नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी आदित्य हे नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी स्थानिक शिवसैनिकांनी केली. द्वारका चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी शेकडो शिवसैनिक जमले होते. याच ठिकाणी महामार्गाच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. शिवसैनिकांच्या गर्दीमुळे पोलिसांना चौफुलीवरील वाहतूक काही काळ थांबवावी लागली. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मुंबई नाका येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या द्वारका येथे जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा अवधी लागल्याचे वाहनधारकांनी सांगितले. धावत्या दौऱ्यात आदित्य यांनी नाशिकरोड येथे जाहीरपणे संवाद साधला. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी चांगले काम करत आहेत. शिवसेना केवळ घोषणाबाजी करत नाही, प्रत्यक्षात काम करून दाखविते, असा दावा त्यांनी केला. जेलरोड येथे साकारण्यात येणारे बंदिस्त क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.