13 July 2020

News Flash

आदित्य ठाकरेंनी आश्वस्त केल्यानंतरही शेतकऱ्याची आत्महत्या

हलाखीच्या परिस्थितीमुळे पत्नीच्या अंगावरील सर्व दागिने त्यांना विकावे लागले होते.

(संग्रहित छायाचित्र)

कर्जफेडीच्या विवंचनेत वैफल्य आलेल्या दाभाडी येथील मोहन जिभाऊ  निकम या शेतकऱ्याने विषप्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, वृद्ध आई असा परिवार आहे. महत्वाची बाब म्हणजे, अलीकडेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना शेतातील उद्ध्वस्त पीक बघून युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आश्वस्त केल्यानंतरही मोहनने हे टोकाचे पाऊल उचलले.

दाभाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य असलेल्या मोहन यांच्यावर स्थानिक सेवा सोसायटी, मालेगाव मर्चंट बँक तसेच हातउसनवारी धरून जवळपास साडे पाच लाख रुपयांचे कर्ज होते. सततच्या दुष्काळामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. यंदा चांगला पाऊस बरसल्याने प्रारंभी त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र परतीच्या पावसाने सर्व आशा धुळीस मिळाल्या.

अवघे दीड एकर क्षेत्र असलेल्या मोहन यांना नापिकीमुळे डोक्यावरील कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न भेडसावू लागला. हलाखीच्या परिस्थितीमुळे पत्नीच्या अंगावरील सर्व दागिने त्यांना विकावे लागले होते. तसेच नोकरी नसल्याने पत्नीसह दोन्ही शिक्षित मुलांवर उदरनिर्वाहासाठी मजुरी करण्याची वेळ आली. अलीकडेच आदित्य ठाकरे यांनी दाभाडी येथे भेट देऊन ओल्या दुष्काळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. यावेळी मोहनच्या शेतातील मका पिकाच्या नासाडीचे दृश्य बघून आदित्यही हेलावले होते. याप्रसंगी मोहनसह अन्य उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांनी अजिबात खचून जाऊ  नये असे सांगत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे शिवसेना भक्कमपणे उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली होती.

कर्जाच्या तणावाखाली सोमवारी सायंकाळी मोहन यांनी शेतात विष घेतले. नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांना मालेगावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी दाभाडी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2019 12:38 am

Web Title: aditya thakre farmer suicide akp 94
Next Stories
1 गुन्हे वृत्त : युवतीच्या हातातून भ्रमणध्वनी खेचून पलायन
2 कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर छापे
3 स्थानिक राजकारणाची दिशा बदलणार
Just Now!
X