गोदावरी नदी उत्तरोत्तर धोकादायक पातळी गाठत असताना दुसरीकडे या पूरस्थितीचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा गोदावरी काठावर अक्षरश: महापूर आला होता. त्यात तरुणाईचा जसा समावेश होता तसेच महिला, शाळकरी विद्यार्थी, लहान मुलांना पाणी दाखविण्यासाठी धडपडणारे आई-बाबा यांचाही अंतर्भाव होता. शहरवासीयांचे हे पावसाळी पर्यटन पोलिसांची डोकेदुखी वाढविणारे ठरले. शिवाय, विस्कळीत झालेल्या जनजीवनात आणखी भर घालणारे ठरले.
मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्री जोर पकडला आणि पहाटेपासून प्रशासकीय यंत्रणेची धावपळ सुरू झाली.
गंगापूरमधून पाण्याचा विसर्ग पहाटे तीन वाजता १२ हजार क्युसेसपर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे सकाळी हे पाणी शहरात पोहोचले. गोदावरीच्या पातळीत वाढ झाल्याची माहिती समजल्यानंतर पूर पाहण्यासाठी येणाऱ्यांची लगबग सुरू झाली. मुसळधार पावसात अनेक महाविद्यालयीन युवक व युवती सोमेश्वर धबधब्यापासून ते कन्नम वार पुलापर्यंत जिथून गोदावरीचा पूर न्याहाळता येईल तिकडे भ्रमंती करत होता.
आसाराम बापू आश्रम, गोदा पार्कलगतहून रामवाडीला जोडणारा पूल, घारपुरे घाट, अहिल्यादेवी होळकर, दहीपूल, कन्नमवार पूल आदी सर्वच ठिकाणी पूर बघणाऱ्यांची एकच गर्दी होऊ लागली. जसजशी पाण्याची पातळी वाढू लागली, तशी पर्यटकांची गर्दी वाढत होती. त्यात महिला, पुरूष, लहान मुले, शाळकरी विद्यार्थी आदींचा समावेश होता. अनेकांकडून ‘सेल्फी’ काढताना धोकादायक मार्गाचा अवलंब सुरू होता. अहिल्याबाई होळकर पूलावर इतकी गर्दी होती, की शहराच्या दोन्ही भागांना जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांकडून पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली जात असली तरी बहुतेकांनी तिकडे दुर्लक्ष केले.
मुसळधार पाऊस सुरू असताना पोलिसांनी गोदावरीकडे जाणारे मार्ग धोकादायक स्थितीमुळे वाहतुकीसाठी बंद केले. त्यात काही दुचाकीस्वार नियमांचे उल्लंघन करत आपली वाहने दामटवत होती. या एकंदर स्थितीमुळे पोलीस यंत्रणेच्या डोकेदुखीत वाढ झाली. भर पावसात ठिकठिकाणच्या चौकात उभे राहून त्यांना वाहतुकीचे नियमन करावे लागले.
पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसातून कसेबसे मार्ग काढत अनेकांना घर गाठायचे होते. परंतु, एसटी महामंडळाने प्रवाशांची घटलेली संख्या लक्षात घेऊन फेऱ्या कमी केल्या. त्याचा आर्थिक फटका अनेकांना सहन करावा लागला. रिक्षावाल्यांनी ही पर्वणी साधून प्रवाशांची लूट केली. त्यात गोदावरीच्या पुलावरून जाणाऱ्या मार्गावरील पर्यटकांच्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली.