06 August 2020

News Flash

झोपडपट्टय़ांमध्ये करोना शिरकावाने प्रशासनापुढील आव्हानात भर

गुरूवारी दुपापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात नव्या १६ रुग्णांची भर पडली.

संग्रहित छायाचित्र

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून सरासरी १०० ते १५० करोनाचे रुग्ण आढळणाऱ्या नाशिकमध्ये हा आकडा एकाच दिवसात २३० वर गेल्याने शहरात कमालीची धास्ती पसरली आहे. झोपडपट्टय़ांमध्ये करोनाचा शिरकाव होऊ लागल्याने महापालिकेसमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे.

अनेक पातळ्यांवर प्रयत्न करूनही करोना नियंत्रणात येत नसल्याचे चित्र असून शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रदीर्घ काळ करोनामुक्त राहिलेल्या देवळा तालुक्यात करोनाचा फैलाव सुरूच आहे. एकाच दिवशी सहा रुग्णांची भर पडून रुग्णसंख्या १९ वर पोहोचली. जिल्ह्य़ात सध्या केवळ पेठ आणि सुरगाणा हे दोनच तालुके करोनामुक्त आहेत.

वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, गुरूवारी पालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आरोग्य, वैद्यकीय विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. एकाच दिवसांत सर्वाधिक म्हणजे २३० नवीन रुग्ण आढळले. रुग्णसंख्या २४०० चा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. सद्यस्थितीत निम्मे म्हणजे १२०० रुग्ण उपचार घेत आहेत. करोनामुळे १०७ जणांचा मृत्यू झाला. तर १०२९ रुग्ण उपचारानंतर घरी परतले. दाट लोकवस्तीच्या भागात करोनाचा कहर सुरू असतांना झोपडपट्टय़ांमध्येही तो शिरकाव करत आहे. बाधितांच्या संपर्कातील अनेक जण सकारात्मक आढळतात. नव्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची संख्याही अधिक असू शकते. त्यांचे अहवाल आल्यानंतर याची स्पष्टता होणार असली तरी शहरवासीयांची चिंता वाढली आहे. मालेगाव महापालिकेने दीड ते दोन महिन्यात करोनावर काहीअंशी नियंत्रण मिळवले. नाशिक शहरात करोनाचा आलेख वेगाने उंचावत असतांना यंत्रणांची दमछाक होत आहे.

दाट लोकवस्तीच्या भागात घरोघरी सर्वेक्षण, रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी औषधांचे वितरण, ज्येष्ठ नागरिकांची तपासणी अशा विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. गर्दी रोखण्यासाठी बाजारपेठांमधील दुकानांची वेळही पाचपर्यंत सिमित करण्यात आली आहे. सायंकाळी सात ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदीची कठोर अमलबजावणी सुरू झाली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांविरूध्द कारवाईचे सत्र सुरू आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांवर क्षमतेहून अधिक वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे.

ग्रामीण भागात देवळा नवीन केंद्रबिंदू

गुरूवारी दुपापर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात नव्या १६ रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्य़ाची आकडेवारी साडेचार हजाराचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. दुपारी ९५ अहवाल प्राप्त झाले. त्यात १६ सकारात्मक तर ७८ जणांचे अहवाल नकारात्मक होते. एकाचा अहवाल अनिर्णित आहे. बाधित रुग्णांमध्ये देवळा तालुक्यातील १० जणांचा समावेश आहे. इगतपुरी, निफाड, नाशिक शहरातील काही रुग्ण आहेत. ४४६९ रुग्णांपैकी दोन हजार ४५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. २४० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या १७७४ रुग्ण उपचार घेत आहेत. पेठ, सुरगाणा तालुक्यात एकही करोनाबाधित रुग्ण नाही. देवळा तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्यावी, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 2:05 am

Web Title: administration facing challenge after coronavirus enter in slums zws 70
Next Stories
1 घरमालक भाडेकरू वादात महिलेचा मृत्यू
2 Coronavirus : शहरात करोनाचे १८५ नवीन रुग्ण
3 खासगी रुग्णालयांत ७०७ खाटा रिकाम्या
Just Now!
X