|| चारुशीला कुलकर्णी, 

घोटी पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल; कायद्याविषयी प्रशासन अनभिज्ञ :– जिल्हा प्रशासनाने वेठबिगार मजुरांची माहिती संकलित करणे अपेक्षित असताना याबाबत प्रशासन आणि पोलीस अनभिज्ञ असल्याने ठेकेदार बागायतदारांचे फावले आहे. संबंधितांच्या पैसे वसूल करण्याच्या वृत्तीमुळे वेठबिगार मजुरांसोबत त्याच्या कुटुंबाचे भविष्य अधांतरी आहे. यामध्ये बालके भरडली जात असून त्यांना मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागते. बुधवारी रात्री याबाबत जिल्ह्य़ातील पहिला गुन्हा घोटी पोलीस ठाण्यात दाखल झाला.

जिल्ह्य़ातील आदिवासी दुर्गम भागात आदिवासी बांधव पावसाच्या पाण्यावर शेती करतात. तर उर्वरित वेळेत जिल्ह्य़ातील सुजलाम सुफलाम भागात किंवा राज्यात अन्य ठिकाणी जाऊन शेतमजूर म्हणून राबतात.

आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत ठेकेदार मंडळी सक्रिय झाली असून विशिष्ट भागात जात काम देतो, असे सांगत लोकांना कामासाठी बाहेर काढले जात आहे. यासाठी काही अल्पशी ठरावीक रक्कम माथी मारत त्यांच्याकडून ढोर मेहनत करून घेतली जात असल्याची तक्रार श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते भगवान मधे यांनी केली. आदिवासींना मिळणारा मोबदला किमान वेतनापेक्षाही कमी म्हणजे नऊ ते २० हजार रुपये असून त्या बदल्यात त्यांना पाच महिन्यांहून अधिक काळ राबविले जाते.

बदल्यात मजूर संपूर्ण कुटूंबासह कामाच्या ठिकाणी जातो. या ठिकाणी गरोदर महिलांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्य सेवा, चिमुकल्यांना शिक्षण किंवा त्यांची नियमित आरोग्य तपासणी होत नाही. आजारपणातील उपचारासाठी खाडा पडेल अशी भीती दाखवत त्यांना रुग्णालयातही पाठविले जात नाही. दोन ते पाच वयोगटातील बालकांना अंगणवाडीत जाऊ दिले जात नाही.

पालकांचा वेळ जाईल यासाठी मुलांना कामाच्या ठिकाणी खेळा किंवा काम करा, असा सल्ला दिला जातो. संबंधित ठेकेदार, बागायतदार किंवा अन्य घटकांकडून महिला, बाल हक्कांच्या कायद्यांचे उल्लंघन होत असताना जिल्हा प्रशासन मात्र या सर्व प्रकाराविषयी अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वेठबिगार कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती संकलित करणे आवश्यक असताना आजवर याविषयी कुठलीच कारवाई झालेली नसल्याचे घोटी प्रकरणानंतर उघड झाले.

अखेर गुन्हा दाखल

वेठबिगार किंवा त्या संबंधित कायदा १९७६ साली अस्तित्वात आला. मात्र त्या विषयी फारशी चर्चा न झाल्याने पोलीस प्रशासन याविषयी अनभिज्ञ आहे. दिंडोरी येथील द्राक्ष बागायतदार विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदार पुढे आला असता अद्याप गुन्हा दाखल नाही. घोटी येथेही २४ तासांहून अधिक वेळ श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते कायद्याविषयी माहिती देत अधिकाऱ्यांशी चर्चा करत राहिले. अखेर बुधवारी पहाटे दोन वाजता गुन्हा दाखल झाला. पिंटू रण (२८, रा. तारांगणपाडा) याने घोटी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार इगतपुरीतील संशयित बाळू जाधव (रा. टाकेद) याने जुलै महिन्यात पिंटू यास दोन हजार आणि त्यानंतर १८ हजार रुपये उचल दिली होती. त्या बदल्यात गणपत वाघ यांच्याकडून त्यांचे घर लिहून घेतले. उचल फेडण्याकरिता त्यांच्या वीटभट्टीवर पिंटूने काम करायचे ठरले. पिंटू आणि त्याची पत्नी रविता ही दिवाळी पासून तीन मुलांसोबत त्या ठिकाणी काम करत होती. पिंटू आजारी असतांना त्याला शिवीगाळ करत त्याच्याकडून, पत्नीकडून काम करून घेतले. या सर्व प्रकाराविरोधात तक्रारीनंतर जिल्ह्य़ात पहिला गुन्हा दाखल झाला.