13 August 2020

News Flash

इदगाह मैदानावरील लाखोंची गर्दी रोखण्यात मालेगावात यश

करोनाविरूद्ध पोलिसांचे नियोजन यशस्वी, नमाजासाठी एकही व्यक्ती उपस्थित नाही

करोनाविरूद्ध पोलिसांचे नियोजन यशस्वी, नमाजासाठी एकही व्यक्ती उपस्थित नाही,  ग्रामीण पोलीस अधिक्षकांचा सलग चाळीस दिवस मुक्काम  

अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : दोन महिन्यात मालेगावात बंदोबस्तावरील सुमारे १५० पोलीस, राज्य राखीव दलाच्या जवानांना करोनाचा प्रादुर्भाव झाला. यातील दोन पोलिसांचा मृत्यू झाला. रुग्णांचा आलेख झपाटय़ाने उंचावत असतांना दाट वस्ती अन् अरुंद गल्ली बोळ असणाऱ्या मालेगावात पोलीस, राज्य राखीव दलाचे जवान हिंमतीने उभे आहेत. खुद्द ग्रामीण पोलीस दलाच्या प्रमुख डॉ. आरती सिंह यांनी सलग ४० दिवस मुक्काम ठोकला. धर्मगुरू, लोकप्रतिनिधींसह नागरिकांनाही विश्वासात घेतले. व्यापक जनजागृती केली. त्याचे फलित रमजान ईदच्या दिवशी प्रत्यक्षात आले. गत वर्षी रमजान ईदच्या दिवशी ज्या इदगाह मैदानावर दीड लाख लोक नमाज पठणासाठी एकत्र जमले होते, तिथे यंदा एकही व्यक्ती आली नाही. ग्रामीण पोलिसांच्या नियोजनामुळे करोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यात यश मिळत आहे.

उत्तर महाराष्ट्रात मालेगाव हे सर्वाधिक ६९७ रुग्ण असणारे शहर ठरले आहे. सुमारे १० लाख लोकसंख्येच्या शहरात नागरी वस्ती अतिशय कमी क्षेत्रफळात वसलेली आहे. करोनाचा वेगाने प्रसार होण्यामागे ते कारण ठरले. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी आरोग्य, जिल्हा प्रशासन, महापालिका अशा सर्व यंत्रणा कार्यप्रवण आहेत. यात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलेल्या पोलिसांची कामगिरी निश्चितच वेगळी ठरली. टाळेबंदी सुरू झाल्यापासून अवघे दल अहोरात्र कार्यरत आहे.

ईदच्या पार्श्वभूमीवर, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी १८०० पोलीस अधिकारी-कर्मचारी, राज्य राखीव, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा तैनात आहेत. मालेगावमध्ये एकूण ६०० मस्जिद आहेत. मुस्लिम धर्मियांची संख्या सहा लाखाच्या घरात आहे. मागील आठ आठवडय़ांत शुक्रवारच्या नमाज पठणासाठी एकही व्यक्ती मस्जिदीत गेली नाही. ‘शब्बे ए बारात’ हा देखील मुस्लिम धर्मियांचा महत्वाचा सण. त्यासाठी बडा कब्रस्तानमध्ये दरवर्षी लाखो लोक जमा होतात. यंदा मात्र तो देखील गर्दी करून साजरा झाला नाही. शब्बे ए बारातच्या दिवशी कोणीही बडा कब्रस्तानमध्ये गेले नाही.

करोनाची साखळी तोडण्यासाठी गर्दी टाळणे हा महत्वाचा उपाय. यावर पोलीस दलाने लक्ष केंद्रित केले. या काळात बंदोबस्तावर तैनात सुमारे १५० पोलीस आणि राज्य राखीव दलाचे जवान करोनाबाधित झाले. उपचारादरम्यान दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर असणाऱ्या पोलीस अधिक्षिका आरती सिंह यांनी मालेगावात ठाण मांडून सर्वाना लढण्याची हिंमत दिली. करोनाबाधित क्षेत्रात पोलीस संचलनाचे नेतृत्व केले. ठिकठिकाणी तैनात पोलिसांना सुरक्षेच्यादृष्टीने मार्गदर्शन, सोयी सुविधा पुरविण्याची काळजी घेतली. पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले. यामुळे कठीण परिस्थितीत दल झुंज देत आहे. दरवर्षी रमजान ईदच्या दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते. लाखोंच्या संख्येने मुस्लिम धर्मिय एकत्र येतात. यंदा सर्वानी घरीच नमाज पठण करून ईद साजरी केली. कुठेही गर्दी झाल्याचे दिसले नाही. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने नजर ठेवण्यात आली. या सर्वाचे दृश्य परिणाम मालेगावात पहायला मिळाले.

दोन महिन्यांपासून मालेगावात ग्रामीण पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. टाळेबंदीच्या काळात मालेगावमध्ये शुक्रवारच्या नमाज पठणासाठी एकही व्यक्ती मस्जिदीत गेलेली नाही. दरवर्षी शब्बे ए बारातच्या दिवशी बडा कब्रस्तानमध्ये तीन लाख लोक जमतात. यावर्षी तिथे कोणी गेले नाही. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर, बैठका घेऊन सर्व धर्मगुरूंशी चर्चा करण्यात आली होती. गर्दी टाळण्यासाठी घरीच नमाज पठण करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यास सर्वाचा प्रतिसाद मिळाला. यामुळे या दिवशी एकही व्यक्ती इदगाह मैदानावर आली नाही.

– डॉ. आरती सिंह (पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 4:38 am

Web Title: administration success in malegaon to stopping lakhs of crowd in idgah maidan zws 70
Next Stories
1 Coronavirus : शहरात करोनाचा आलेख उंचावला
2 करोना संकटात ‘आरोग्य यात्रा’ चे प्रशासनाला सहाय्य
3 Coronavirus : नाशिकमध्ये पुन्हा एका पोलिसाचा मृत्यू
Just Now!
X