रुग्णांसह नातेवाईकांचीही नाराजी

नाशिक : शहर परिसरात करोनाचा विळखा घट्ट होत असताना रुग्णालयात खाटा मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. विशेषत सरकारी रुग्णालयांमध्ये खाटा मिळविण्यासाठी, नियमित औषधे घेण्यासाठी रुग्णांची गर्दी होत असते. असे असताना लोकप्रतिनिधींकडून गर्दीवर इलाज करण्यापेक्षा त्रुटींचे भांडवल करत प्रशासनावर ताशेरे ओढण्यात येत आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोपात त्यांना स्वारस्य असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींचे सरकारी रुग्णालयांमध्ये सुरू असलेले राजकीय पर्यटन बंद करण्याची मागणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायू टाकीच्या गळती प्रकरणात तांत्रिक त्रुटींमुळे दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री छगन भुजबळ, मंत्री दादा भुसे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, के ंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खा. हेमंत गोडसे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी भेट घेत तेथील अपुऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेतला. प्रशासनावर येथील रुग्णांना होणारा त्रास, त्यांच्यासाठी आवश्यक सोयी-सुविधा याविषयी तक्रोरींचा पाढा वाचण्यात आला. याचीच पुनरावृत्ती बिटको रुग्णालयात होत आहे. या ठिकाणी करोना चाचणी केंद्रासह एचआरटीसीपीची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ही व्यवस्था सुरू नसली तरी बिटको रुग्णालयात करोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तेथील सोयी-सुविधा, त्रुटींची चाचपणी करण्यासाठी आतापर्यंत खा. गोडसे, पालकमंत्री भुजबळ, भाजप नेते किरीट सोमय्या, भुसे, सरोज अहिरे, गिरीज महाजन यांच्यासह अन्य नेत्यांनी भेट दिली.

वास्तविक या ठिकाणी काम करणारे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यांच्यावर कामाचा ताण असताना लोकप्रतिनिधींनी येणे योग्य नाही. लोकप्रतिनिधी येणार म्हटल्यावर अधिकारी, कर्मचाऱ्यांना हातातील काम सोडून देत त्यांच्यासोबत होणाऱ्या आढावा बैठकींसाठी तयार राहावे लागते. कागदांचा खेळ मांडण्यासाठी वैद्यकीय अधिकारी सज्ज असताना त्या ठिकाणी नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांना मात्र ताटकळत राहावे लागते.

लोकप्रतिनिधींमागे फिरत येथील परिस्थितीची माहिती देण्यात ही मंडळी सक्रिय असते. त्यांच्यावर अवलंबून असलेली रुग्णालयातील दैनंदिन कामे, रुग्णांचे वेगवेगळे दाखले, त्या त्या परिसरातील करोना उपचार केंद्राची पाहणी, प्रतिबंधित क्षेत्र पाहणी यासह अन्य कामे करता येत नाहीत. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना या दौऱ्याविषयी माहिती नसल्याने या काळात सर्वाच्या संयमाची परीक्षा लोकप्रतिनिधी घेतात. रुग्णालयांतील त्रुटींविषयी पाठपुरावा करण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेचे वाभाडे काढण्यात या मंडळींना स्वारस्य असल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईकांनी केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना बैठकीत, दौऱ्यात गुंतवून ठेवत रुग्णांना उपचारापासून दूर ठेवले जाते, असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

सर्वसामान्यांना वाली कोण?

काही दुर्घटना घडली किंवा आपण काम करतोय, जनतेची काळजी घेतोय, हे दाखविण्यासाठी लोकप्रतिनिधी वारंवार सरकारी रुग्णालयांमध्ये येतात. खासगी रुग्णालयांमध्ये यांचा दौरा नसतो. देयक रक्कम कमी करा यासाठी ते शब्द वापरत नाहीत. उलट सरकारी रुग्णालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी यांना सल्ले देत त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होतो. येथील त्रुटी जाणून घेण्यापेक्षा काम सुरळीत कसे राहील, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्राणवायू असो किं वा रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे. हे रुग्णालयातच कसे मिळेल यासाठी कोणी प्रयत्न करत नाही. कालपासून प्राणवायूसज्ज असलेली खाट मिळवण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, बिटको रुग्णालयाच्या फेऱ्या मारत आहे. खासगी रुग्णालयात वयोमर्यादेचे कारण देत ज्येष्ठांना दाखल करून घेत नाहीत. सरकारी डॉक्टर लोकप्रतिनिधींसोबत चर्चेत मग्न आहेत. आम्हाला वाली कोण?

– चैतन्य काकडे (रुग्णाचे नातेवाईक)