आचारसंहितेआधी विकासकामे उरकण्याचे नगरसेवकांपुढे आव्हान

विधानसभा मतदार यादीचे महापालिका प्रभागनिहाय विभाजन करण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे फेब्रुवारीत होणाऱ्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात एकच लगबग सुरू झाली आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शक्य तितक्या लवकर विकासकामे व तत्सम कामांचे भूमिपूजन, उद्घाटन कसे करता येईल यादृष्टीने संबंधितांची तयारी सुरू झाली आहे. चार सदस्यीय पद्धतीने होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत महिनाभरापूर्वीच जाहीर झाली होती. आता मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे राजकीय पातळीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या घडामोडींना आणखी वेग येणार आहे.

नाशिक महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होणार असून त्यासाठी मतदार यादी तयार करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे मतदार यादी तयार केली जात नाही. विधानसभेची मतदार यादी त्यासाठी वापरली जाते. मतदार यादीत नाव नोंदणीची प्रक्रिया निरंतरपणे सुरू असते. निवडणूक आयोगाने मध्यंतरी प्रारूप मतदार यादी जाहीर करत मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमानुसार नाशिक महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०१७ रोजी जाहीर होणार आहे. हीच मतदार यादी महापालिका निवडणुकीचे प्रभागनिहाय विभाजन करून वापरण्यात येईल. नवीन वर्षांच्या पहिल्या महिन्यात यासंबंधीची सर्व प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यात प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना, प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी तयार करणे ही कामे या काळात होतील.

विधानसभा मतदार यादीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या आणि महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील मतदारांची संख्या समान आहे, तसेच हद्दीबाहेरील मतदार त्यात समाविष्ट झाले नाहीत, याची छाननी करण्यात येईल. महापालिकेच्या एकूण १२२ पैकी अनुसूचित जाती प्रवर्गाचे १८, अनुसूचित जमाती ९, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) ३३ आणि सर्वसाधारण ६२ जागा राहणार आहेत. एकूण जागांपैकी ६१ जागा महिलांसाठी राखीव आहेत. प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्यापासून विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. मनसे आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन कित्येक विद्यमान नगरसेवक सत्ताधारी भाजप व शिवसेनेत डेरेदाखल झाले आहेत. महापालिकेत सत्तेत असणाऱ्या मनसेची या काळात बरीच वाताहत झाली. निम्म्याहून अधिक नगरसेवकांनी पुढील गणिते गृहीत धरून आधीच पक्षांतर केले आहे. मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे निवडणुकीची घटिका समीप आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पुढील काळात पक्षांतराला आणखी वेग येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.