नाशिक येथे ‘रोड शो’च्या समारोपावेळी मुख्यमंत्र्यांचा निर्धार

नाशिक : महाजनादेश यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला. या यात्रेचा गुरूवारी समारोप होत असला तरी विजय यात्रा लगेच सुरू करायची आहे. ही यात्रा विधानसभेवर भाजप महायुतीचा झेंडा लावून समाप्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे आगमन झाले. यानिमित्त भर पावसात ‘रोड शो’ काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी भाजप महायुती असा उल्लेख करतांना त्यांनी शिवसेनेचे नाव टाळले. दुसरीकडे मनसेने हवेत काळे फुगे सोडून, तर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी फलक झळकावून यात्रेचा निषेध केला. काही ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध करणाऱ्यांना मारहाण केली.

महाजनादेश यात्रेनिमित्त शहरातील तीन मतदारसंघात ‘रोड शो’, मोटारसायकल फेरी काढून भाजपने शक्तीप्रदर्शन केले. रोड शो मध्यावर असताना पावसाने जोरदार हजेरी लावली. पंचवटी कारंजा चौकात रोड शोच्या समारोपावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर भाषण करायचे असल्याने अधिक बोलणार नसल्याचे सांगितले. अभूतपूर्व स्वागताबद्दल शहरवासीयांचे आभार मानले. दरम्यान, काही ठिकाणी विरोध करणारे विद्यार्थी भाजप कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडले. त्यांनी संबंधितांना चोप दिला. यात्रा, जाहीर सभा काळात कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सिटू युनियन आदी पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. अनेकांना सकाळपासून पोलीस ठाण्यांमध्ये बसवून ठेवण्यात आले. अनेकांना ताब्यात घेतले. यात्रा यशस्वी करण्यासाठी भाजप सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत असल्याचा आरोप सिटूचे डॉ. डी. एल. कराड यांनी केला.