निद्रिस्त यंत्रणेला जाग..
महापालिकेची निद्रिस्त यंत्रणा मान्यवरांच्या आगमनानंतरच कशी जागी होते, याचा प्रत्यय सोमवारी मनसे अध्यक्षांच्या प्रस्तावित इतिहास संग्रहालयाच्या जागेच्या पाहणी दौऱ्यावेळी आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि राज हे भेट देणार असल्याने पालिकेचे अधिकारी ठेकेदारासह दहा ते बारा कामगारांना घेऊन सकाळीच या ठिकाणी अवतीर्ण झाले. अग्निशमन दलाचा बंबही तातडीने बोलाविला गेला. कामगारांनी प्रांगण व सभागृहाची साफसफाई केली. राज यांच्या मागील दौऱ्यानंतर सुमारे दीड ते दोन महिने दुर्लक्षिलेला हा परिसर अवघ्या एक-दोन तासांत चकचकीत झाला. घंटागाडीची व्यवस्था कोलमडल्याने शहरात कचऱ्याचे ढीग साचले असताना दुसरीकडे पालिकेने या ठिकाणी दाखविलेली उत्स्फूर्तता चर्चेचा विषय ठरली.
गंगापूर रस्त्यावरील पंपिंग स्टेशन परिसरात महापालिकेच्या विस्तीर्ण जागेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने सोमवारी सकाळी राज हे शिवशाहीर पुरंदरे यांच्या समवेत परिसरास भेट देणार होते. तत्पूर्वी हा परिसर स्वच्छ करण्याचे शिवधनुष्य पालिका यंत्रणेने लीलया पेलले. दिवाळी काळात घंटागाडीची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली.
तीन ते चार दिवस घंटागाडी येत नसल्याने नागरिकांनी वैतागून कचरा बाहेर फेकण्यास सुरुवात केली. सार्वजनिक ठिकाणी साफसफाई होत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचल्याचे दृष्टिपथास पडते. ‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभागी होणाऱ्या नाशिकच्या या स्थितीकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेने राज यांच्या दौऱ्यावेळी मात्र कसली तोशीष पडू दिली नाही.
सकाळी आठच्या सुमारास पालिकेचे तीन-चार अधिकारी ठेकेदाराला घेऊन या ठिकाणी पोहोचले. साफसफाईसाठी कामगारांना युद्धपातळीवर जुंपण्यात आले. दरम्यानच्या काळात अग्निशमन दलाचा बंब दाखल झाला. रिकाम्या सभागृहांची झाडलोट सुरू झाली. परिसरातील पालापाचोळा संकलित करून तो मागील बाजूस फेकला गेला. एरवी या जागेचा वापर टवाळखोर व मद्यपींकडून होत असतो. स्वच्छता मोहिमेत सापडलेल्या विपुल बाटल्यांवरून ते स्पष्ट झाले. झाडलोट झाल्यावर अग्निशमन दलाने पाण्याचे फवारे मारत परिसर चकाचक केला. परिसरातील तीन ते चार सभागृह, विस्तीर्ण परिसरातील पदपथ अवघ्या एक ते दोन तासांत स्वच्छ करण्यात आले. मान्यवरांची छोटेखानी बैठक होईल या दृष्टीने टेबल, खुच्र्या व तत्सम साहित्य लगोलग मागविण्यात आले.
या परिसराच्या स्वच्छतेसाठी पालिका यंत्रणेने दाखविलेली सजगता शहरात इतरत्र का दिसत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.