News Flash

राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत घटनेचे गांभीर्य झाकोळले

भाजपच्या मागणीनंतर महापालिकेचीही स्वतंत्र चौकशी समिती

(संग्रहित छायाचित्र)

महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्राणवायूच्या टाकीतील गळतीमुळे घडलेल्या दुर्घटनेचे राजकीय पातळीवर तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्य शासनाने या घटनेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सात तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापन केली. महापालिकेतील सत्ताधारी भाजपने या प्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी समिती स्थापन करून रुग्णालयात प्राणवायू टाकी बसविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत मूळ घटनेचे गांभीर्य लोप पावत असल्याचे चित्र आहे.

बुधवारी प्राणवायूच्या टाकीला गळती होऊन झाकीर हुसेन रुग्णालयात हाहाकार उडाला होता. वेळेवर प्राणवायू न मिळाल्याने २४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचे पडसाद गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले. रुग्णालयातील मृत्यू तांडवामुळे रुग्णालय व्यवस्थापनासह प्रशासकीय यंत्रणाही हादरली. या घटनेनंतर रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत राजकीय नेत्यांची रीघ लागली होती. रुग्णालयात भेट देणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध नातेवाईकांकडून संतप्त भावना व्यक्त झाल्या. पालकमंत्री छगन भुजबळ, महापौर सतीश कुलकर्णी, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, अन्न-औषध प्रशासनमंत्री राजेंद्र शिंगणे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदींनी स्वतंत्रपणे रुग्णालयास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. टोपे यांनी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची उच्चस्तरीय समितीची स्थापन करण्यात आल्याचे जाहीर केले. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नियमावली तयार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरेकर यांनी या घटनेला राज्य सरकारला जबाबदार धरले. या प्रकरणाची जबाबदारी सरकारची असल्याचा आरोप करीत रुग्णांना प्राणवायू पुरविण्याची मागणी केली. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यांच्या कार्यकाळात प्राणवायूच्या टाकीचे काम पुण्यातील एका कंपनीला देण्यात आले होते. हा धागा पकडून शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी भाजपला लक्ष्य केले. भाजपच्या पालिकेतील सत्ताकाळात सत्ताधारी आणि ठेकेदार यांचा एक वेगळाच ऋणानुबंध बघायला मिळतो. ज्यातून निकृष्ट दर्जाच्या यंत्रणा महापालिकेत वाजतगाजत आणल्या जातात. या घटनेस जबाबदार असणारा ठेकेदार असो किं वा त्यास पाठीशी घालणारा अधिकारी असो, संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत भाजपचे सभापती गणेश गिते यांनी या दुर्घटनेची महापालिके कडून स्वतंत्रपणे चौकशी करण्याचा निर्णय घेतला. या समितीत नगरसेवक आणि काही अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निश्चित झाले. प्र्राणवायूची टाकी बसविणाऱ्या ठेकेदारावर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. टाकीचा ठेका देण्यासाठी विशिष्ट अधिकाऱ्याने अटी-शर्तीत बदल केल्याचे आक्षेप सदस्यांनी केले. नाशिक रोडच्या बिटको रुग्णालयातील प्राणवायूच्या टाकीची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. पालिका प्रशासनाने आक्षेपांचे खंडन केले. प्राणवायू टाकी, रुग्णालयातील वितरण व्यवस्था यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात आल्या होत्या. त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. प्राणवायूच्या व्यवस्थेसाठी रुग्णालयात पालिकेचे दोन अभियंते नियुक्त करण्यात आले आहेत. प्राणवायू गळतीमुळे रुग्णालयातील २४ करोनाबाधितांचा हकनाक बळी गेला. या दुर्घटनेनंतर होणारे आरोप-प्रत्यारोप राजकीय पटलावरील असंवेदनशीलता अधोरेखित करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 12:04 am

Web Title: after the demand of bjp an independent inquiry committee of nmc also abn 97
Next Stories
1 रुग्णांच्या नातेवाईकांचा लोकप्रतिनिधींविरुद्ध संताप 
2 ‘आता सर्व रुग्णालयांच्या प्राणवायू प्रकल्पांची तपासणी’
3 गळती झालेली प्राणवायूची टाकी दीड महिन्यापासून कार्यान्वित
Just Now!
X