अनुचित प्रकार टाळण्यासाठी २३ जण ताब्यात

नाशिक : लोकसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर समर्थक आणि उमेदवाराकडून होणारा जल्लोष, देण्यात येणाऱ्या घोषणाबाजीमुळे होणारे वादविवाद टाळण्यासाठी निकालानंतर विजयी उमेदवाराला शहर परिसरात विजयी मिरवणूक काढता येणार नाही. निकालाच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून २३ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, शहर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघ्या २४ तासांचा कालावधी शिल्लक असल्याने राजकीय कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांमध्येही निकालाविषयी उत्सुकता वाढली आहे. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये प्रचारादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. उमेदवारांनीही एकमेकांविरुद्ध चिखलफेक न केल्याने प्रचार शांततेत राहिला. आता निवडणूक निकालाचा दिवस उंबरठय़ावर आल्याने कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता वाढू लागली आहे. या अस्वस्थतेचा स्फोट होऊ नये म्हणून पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

उमेदवाराचा विजयोत्सव जंगी मिरवणुकीने साजरा करण्याच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर यावेळी विरजण पडणार आहे. विजयाच्या उन्मादात होणारी गुलालाची उधळण, ढोल-ताशाचा आवाज आणि फटाक्याची आतषबाजी यापासून विजयी उमेदवाराला दूर राहावे लागणार आहे. निकालानंतर घडणारे अनुचित प्रकार पाहता यंदा विजयी मिरवणूक काढता येणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. निकाल जाहीर होत असताना शहर परिसरात घडणाऱ्या घडामोडी लक्षात घेता सर्वच राजकीय पक्षांची कार्यालये, उमेदवार, त्यांची संपर्क कार्यालये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मागील काही तपशिलाचा अभ्यास करता ४८ मतदान केंद्रे संवेदनशील जाहीर करण्यात आली होती. या मतदान केंद्रांच्या परिसरातही पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.

मतमोजणीसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था

अंबड वेअर हाऊस परिसरात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था नेमण्यात आली आहे. तसेच मतमोजणी परिसरासह शहरात अन्य ठिकाणी बंदोबस्तासाठी राज्य राखीव दलाच्या दोन तुकडय़ांसह चार उपायुक्त, सहा साहाय्यक पोलीस आयुक्त, २६ निरीक्षक, ९५ साहाय्यक निरीक्षक, ७५३ पोलीस कर्मचारी, २११ महिला कर्मचारी, ३०० गृहरक्षक यांच्यासह पाच शीघ्रकृती दल तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय राज्य गुप्त वार्ता विभागालाही याबाबत कल्पना देण्यात आली आहे. निकालानंतर शहर परिसरात कुठल्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही, गैरप्रकार घडणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी नमूद केले.