त्र्यंबक रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव परिसरात एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोहून झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. तलाव व्यवस्थापकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हेमंत वसंत तरटे (५७) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

द्वारका येथील जनरल वैद्यनगरमध्ये वास्तव्यास असणारे तरटे हे जलतरण तलावाचे वार्षिक सभासद होते. सावरकर जलतरण तलावात ते नियमित पोहण्यासाठी येत असत. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता ते नेहमीप्रमाणे पोहणे झाल्यानंतर कपडे बदलत असताना त्यांना अकस्मात श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. हे लक्षात आल्यानंतर तलावाचे व्यवस्थापक हरी सोनकांबळे यांच्यासह इतर नागरिकांनी धाव घेतली.

त्यांना तातडीने उपचारासाठी जवळील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत तरटे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

यापूर्वी जलतरण तलावात असे काही प्रकार घडले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचेही याआधी हृदयविकाराने निधन झाले आहे.