११ वर्षांनंतर दहेगाव धरण तुडुंब

लोकसत्ता वृत्तविभाग

मनमाड /नांदगाव :  जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे सलग तीन महिने शहर आणि परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणारे वाघदर्डी धरणही ओसंडून वाहू लागले. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापासून सलग १० दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी सायंकाळी पुन्हा शहरांत जोरदार हजेरी लावली.

उत्तरा नक्षत्रानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली. त्यामुळे चिखल, दलदल आणि पाण्याचे तळे यातून मनमाडकर सुटले होते.

ऑक्टोबर सुरू होण्यापूर्वीच शहरात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागला. उष्म्यातही वाढ झाली. रणरणत्या उन्हाने नागरिक हैराण झाले होते. बुधवारी दुपापर्यंत कडक ऊन होते. दुपारी चारनंतर आभाळ भरून आले. आणि सायंकाळी पाचच्या सुमारास हस्त नक्षत्राचा तडाखेबंद पाऊस सुरू झाला. त्यामुळे सखल भागात पाण्याचे तळे साचले. उघडय़ावर ठेवलेला कांदा आणि शेती पिकांचे यामुळे नुकसान झाले. सलग तीन महिने परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. सप्टेंबरच्या मध्यात नको तो पाऊस म्हणण्याची वेळ शेतक?ऱ्यांवर आली. पाणी साचल्याने शेतीची कामे ठप्प झाली होती.

दुसरीकडे, नांदगाव शहराला गुरुत्वाकर्षणाने पाणीपुरवठा करणारे दहेगाव धरण तब्बल ११ वर्षांनी १०० टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. या धरणाचा जलसंचय साठा ७३.५ दशलक्ष घनफूट असून मृतसाठा ४.५ दशलक्ष घनफूट एवढा असून उंची २० मीटर आहे. दहेगाव धरण भरल्यामुळे नांदगाव शहराचा पुढील तीन वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार असून शहराला दोन ते तीन दिवसाआड  पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. धरणाखाली हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना धरणातील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमतादेखील वाढलेली आहे. दहेगाव धरण भरल्यानंतर नगराध्यक्ष राजेश कवडे आणि नगर परिषद कर्मचारी यांनी पाहणी करून समाधान व्यक्त केले.