शहरातील वाढती गुन्हेगारी, अन्याय आणि अत्याचाराच्या निषेधार्थ ‘जागरूक नाशिककर’ संघाच्या वतीने सोमवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. गेल्या दीड वर्षांमधील पोलिसांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी यावेळी केली जाणार असल्याची माहिती संघाच्या वतीने राजू देसले यांनी दिली.
शहरात दीड वर्षांपासून गुन्हेगारी वाढली आहे. लूटमार, सोनसाखळी चोरीच्या घटना, खून हे नित्याचे झाले आहे. गुन्हेगार खुलेआम हिंडत असताना पोलिसांचा सामान्य माणसांवरील अत्याचार वाढला आहे. जनआंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे. कॉलेज रोडला पोलीस अधिकाऱ्यांची दबंगगिरी शहरवासियांनी अनुभवली. राणेनगरच्या बारावीच्या विद्यार्थ्यांला इंदिरानगर पोलिसांनी केलेल्या विनाकारण मारहाणीचे प्रकरण दडपण्यात आले. मैत्रेय घोटाळा प्रकरणातील संशयितांना न्यायालयात हजर केले असतांना त्यांच्या समर्थकांची न्यायालयात घुसण्यापर्यंत मजल गेली. काळ्या धंद्यावर जुजबी कारवाई करण्याचा देखावा पोलिसांकडून केला जात आहे. वाहनतळांची पुरेशी व्यवस्था करण्याऐवजी वाहन उचलण्याच्या नावाखाली सामान्य माणसांचा छळ केला जात आहे. याचा जाब विचारण्यासाठी निदर्शने करण्यात येणार असल्याचे जागरूक नाशिककर संघाने म्हटले आहे. पोलिसांकडून कोणावर अत्याचार झाला असल्यास त्याची माहिती नाशिककरांनी संघटनेकडे पुराव्यासह जमा करावी. ही माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवली जाणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आयटक कामगार केंद्र, २५ अ, मेघदूत शॉपिंग सेंटर, सीबीएससमोर, नाशिक, किंवा ९८९०२६७११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. नाशिककरांनी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.