महावितरण कंपनी भगूर परिसरात मनमानी पध्दतीने वीज पुरवठा खंडित करत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत वीज उपकेंद्राच्या कार्यालयास टाळे ठोकले. महावितरण कंपनीने काही भागातील वीज पुरवठा खंडित केला तर काही भागात तो कायम ठेवल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वीज अभियंत्यांना जाब विचारला. संसरी पिटर नावाच्या रोहित्रावरून जोडणी दिलेल्या ६० ते ७० शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद आहे. या संदर्भात विचारणा केल्यावर टंचाई विभाग व जलसंपदा विभागाच्या पत्राचा संदर्भ दिला गेला. भगूर उप केंद्रात ६५० कृषी जोडण्या असून केवळ ५० जोडण्या संसरी रोहित्रावर देण्यात आल्या आहेत. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दर्शविलेला नियम एकाच रोहित्राला कसा लागू होतो, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. नदी काठावरील मोटारी लष्करी जवानांनी आधीच उचलून नेल्या आहेत. त्यातच, वीज पुरवठा खंडित असल्याने पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड झाल्याची तक्रार आंदोलकांनी केली. महावितरण कंपनीच्या कारभाराचा निषेध करत शेतकऱ्यांनी वीज उपकेंद्राच्या कार्यालयास टाळे ठोकले.