राजू शेट्टी यांचा इशारा

कोरडय़ापेक्षाही ओल्या दुष्काळात शेतकरी अधिक खचून गेला आहे. खरीप हंगाम गेला, आता रब्बी हंगामही हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्यांनी पीक विमा काढला. तसेच ज्यांचा पीक विमा नाही. परंतु सततच्या पावसामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसोबत वीज देयक माफी दिली तरच शेतकरी उभा राहू शकेल. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे करावा. सत्ता कुणाचीही येवो, शेतकऱ्यांना मदत न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा आसूड ओढू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

अवकाळी पावसाने बागलाण तालुक्यात पिकांच्या झालेल्या नुकसानीची शेट्टी यांनी पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी हा इशारा दिला. ब्राह्मणगाव येथील २० हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे, प्रगतशील शेतकरी नंदकिशोर आहिरे यांची आठ एकर क्षेत्रातील द्राक्ष बाग सततच्या पावसामुळे नष्ट झाली आहे. एकरी अडीच लाख खर्च असा १६ लाख रुपयांपर्यंत केलेला खर्च पूर्णत: पाण्यात गेल्याने नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी शेट्टी यांनी केली.

हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. या पाहणीप्रसंगी राघो अहिरे, ज्ञानदेव आहिरे, अतुल अहिरे, अरुण अहिरे, बाजीराव अहिरे, योगेश अहिरे, जगदीश इनामदार आदी उपस्थित होते.

माझ्या आठ एकर थॉमसन, सोनालिका द्राक्षबागेत एकरी अडीच लाख रुपये असा आठ एकरांमध्ये १६ लाख रुपये खर्च करण्यात आला होता. सततच्या पावसामुळे द्राक्ष बागेचे पूर्णत: नुकसान झाले आहे. पीककर्ज घेऊन पिकवलेली द्राक्षबाग पावसाने पूर्ण हिरावून घेतली आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदतीचा हातभार लावावा.

– नंदकिशोर अहिरे, (द्राक्ष उत्पादक, ब्राह्मणगाव, बागलाण)