या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महागडी कीटकनाशके स्वस्तात विकण्याचा उद्योग

कीटकनाशक फवारणीचे दुष्परिणाम यवतमाळ जिल्ह्यत समोर आले असताना दुसरीकडे नाशिकमध्ये दुकाने फोडून शेतीची महागडी औषधे व कीटकनाशके लंपास करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांनी यश मिळवले. या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीच्या विषबाधेमुळे १९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तर २५ जाणांना कायमचा दृष्टिदोष झाला आहे. आजही शेकडो शेतकरी उपचार घेत आहे.  कीटकनाशकांच्या फवारणीमुळे अंधत्व, मेंदू आजार बळावल्याचे समोर आल्यामुळे त्याच्या वापराबाबत अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली. या घडामोडींमुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण असताना शेती उपयुक्त औषधे व कीटकनाशक चोरणारी टोळी कार्यरत असल्याचे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या कारवाईतून समोर आले.

अधिकृत वितरकांकडून कीटकनाशक व औषधांची खरेदी केल्यास रितसर पावती मिळते. संशयितांनी महागडी कीटकनाशके व औषधे कमी भावात देण्याचे अमिष शेतकऱ्यांना दाखविले होते.  यंदाच्या हंगामात पावसाने चांगली साथ दिल्याने शेतकरीही सुखावला आहे. जिल्ह्यत अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा आहेत. त्या बागांच्या संरक्षणासाठी औषधे, पावडर व कीटकनाशकांचा प्रामुख्याने वापर करण्यात येत असतो. मात्र,  त्यातील अनेक औषधे अतिशय महाग आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ती आर्थिकदृष्टय़ा परवडत नाही.  ही बाब हेरून टोळीने दुकानांमधून औषधे व कीटकनाशके लंपास करण्याचा धडाका लावला होता. औषधे चोरून ती शेतकऱ्यांना स्वस्तात देण्याचा धंदा त्यांनी चालविला होता.

दिंडोरी तालुक्यात सिंदवड गावातील काही तरुण कमी दरात कीटकनाशके, बुरशीनाशक औषधांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पथकाने दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, शिंदवड व खतवड परिसरात रात्रभर पाळत ठेवून सोपान बस्ते (२६, शिंदवड), राहुल मोरे (२६, शिंदवड), सतीष मोरे (२५, कसबेसुकेणे), शुभम गवे (१८, खतवड) यांना शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी हिसका दाखविल्यावर संबंधितांनी साथीदाराच्या मदतीने पिंपळगाव, दिंडोरी, वणी, वडनेर भैरव, निफाड, सुकेणे, मोहाडी आदी ठिकाणच्या पेस्टीसाईडच्या दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली.

संशयिताकडून मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी दुकानांमध्ये चोरी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तवेरा वाहनासह चालक खंडेराव कडाळे (४०, तिसगाव), किरण गायकवाड (१८, बहादुरी) आणि गुलाब लांडे (२१,शिंदवड) यांना ताब्यात घेतले. संशयितांनी चोरी केलेली काही कीटकनाशके लघु बस्ते (४५) व ज्ञानेश्वर गणोरे (३०, खडकसुकेणे) यांना कमी किंमतीत विकली. संशयितांच्या घरांच्या झडतीत सात लाख २९ हजार रुपये किंमतीचे औषधे व कीटकनाशके हस्तगत करण्यात आली. तसेच संशयितांनी गुन्ह्यांमध्ये वापरलेली तवेरा कार, छोटा हत्ती, स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण १३ लाख २४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, साहाय्यक पोलीस निरीक्षक राम करपे, मच्छिंद्र रणमाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

पेस्टीसाईड दुकानातील चोरीवरून सुगावा

पोलीस अधीक्षक संजय दराडे व अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी पेस्टीसाईड दुकानांच्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा आढावा घेऊन ते गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन केले. त्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक स्थापन करण्यात आले. पेस्टीसाईड दुकानात चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीचा अभ्यास करण्यात आला. त्या अंतर्गत चोरीला जाणारे कीटकनाशके व बुरशीनाशके हे ठरावीक कंपनीचे आणि अधिक किंमतीचे असल्याने चोरीला जात असल्याचे लक्षात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या दिशेने तपास सुरू केला होता. त्या तपासाअंतर्गत ही टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agricultural drug thief nashik rural police
First published on: 05-10-2017 at 04:05 IST