१ हजार १४१ कोटी भरले तर ‘महावितरण’ची उर्वरित थकबाकी माफ

नाशिक : प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजवंदन कार्यक्रमात वर्षभरात जिल्ह्याच्या विविध विषयांतील कामगिरीचा पट मांडला गेला. तशीच महावितरणच्या थकबाकीची आकडेवारीदेखील मांडली गेली. त्यानुसार जिल्ह्यातील साडेतीन लाख कृषी पंपधारकांकडे तीन हजार ३९ कोटींची थकबाकी आहे. विशेष योजनेत संबंधितांनी ११४१ कोटी रुपये भरल्यास उर्वरित १८९८ कोटींची थकीत रक्कम माफ होणार आहे. कृषी पंपधारकांनी भरलेल्या रकमेतून ६८६ कोटी रुपये ग्रामपंचायत, जिल्हास्तरावर पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी वापरण्यात येणार आहेत.

पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या सोहळ्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्याची चाललेली घोडदौड अधोरेखित करताना महावितरणच्या थकबाकीची आकडेवारी मांडली. शासकीय कार्यालयातील काम वेळेत होण्यासाठी तसेच शासनाच्या योजनांचा व्यापकपणे लाभ घेता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाने निर्मिलेल्या ई कार्यालय, नाशिक वेब पोर्टल आणि ऑनलाइन आरटीएस या सेवांचे लोकार्पण करण्यात आले. वर्षभरातील कामांचा त्यांनी आढावा घेतला.

करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यंत्रणेला यश मिळाले. उपचाराबरोबर आरोग्य यंत्रणांचे बळकटीकरण, अन्नधान्य वाटप, कृषी व त्यासंबंधित जीवनावश्यक बाबी, उद्योग, औषधपुरवठा, उद्योग परवाने आणि अन्नदानाची शाश्वत साखळी निर्माण करण्यात यशस्वी झाल्याकडे लक्ष वेधण्यात आले. करोनाकाळात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या साडेतीन लाख टन मोफत तांदळाचे वितरण झाले. मेपासून केशरी कार्डधारकांनादेखील अतिरिक्त दीड लाख मेट्रिक टन धान्यवाटप केले असल्याने प्रतिमाह जवळपास साडेआठ लाख मेट्रिक टन म्हणजे तिप्पट धान्य वितरित करण्याचा विक्रम अन्नपुरवठा विभागाने केल्याचा दावा त्यांनी केला.

गेल्या वर्षी प्रत्येक जिल्ह्यात ‘शिवभोजन थाळी’ सुरू करण्यात आली. पाच रुपयांत गोरगरीब जनतेला या योजनेतून भोजनाचा लाभ  देण्यात आला. राज्यात आतापर्यंत तीन कोटीपेक्षा अधिक लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात १७ लाख ५४ हजार लोकांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला असून जिल्ह्यात दररोज सात हजार नागरिक या योजनेचा फायदा घेत असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. ग्रेप पार्क रिसॉर्ट, बोट क्लबच्या माध्यमातून पर्यटनाला चालना दिली जात असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

खरीप पीक कर्जाचा दोन हजार कोटींचा टप्पा पार

कर्जवाटपाचा नियमित आढावा घेतल्यामुळे कित्येक वर्षांनंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच खरीप कर्जाचा दोन हजार कोटींचा टप्पा पार झाला. या वर्षीचे खरीप पीक कर्जवाटप मागील वर्षीपेक्षा ६८० कोटीने जास्त आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारी कार्यक्रम राबविला जात असून विभागात आजपर्यंत १३४७ तर जिल्ह्यात २५५ शेतकरी कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांतून तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उभारी देण्याचे काम सुरू आहे. ‘विकेल ते पिकेल अभियान’ या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ११ पिकांचे ५२ क्लस्टर तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये कांदा, द्राक्ष, डाळिंब, भात, नागली, वरई या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. जून ते ऑक्टोबर २०२० या काळात शेतपिकांचे नुकसान झाल्याने जिल्ह्यात एक लाख ६२ हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १११ कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन कोटी २६ लाख रकमेचा विमा अपघातग्रस्तांच्या वारसदारांना देण्यात आला आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ११ डिसेंबर २०२० पर्यंत एक लाख ३४ हजार ४२७ पात्र शेतकऱ्यांपैकी एक लाख १२ हजार ५८१ इतक्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर एक हजार १३७ कोटी ९१ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे.