ऑगस्टच्या प्रारंभी जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे १३ तालुक्यांत २१ हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नुकसानीचे सविस्तर पंचनाम्याचे काम प्रगतिपथावर असून पुढील आठ ते दहा दिवसात ते पूर्णत्वास जाणार आहे. त्यावेळी पिकांच्या नुकसानीची खऱ्या अर्थाने माहिती मिळेल.

ऑगस्टच्या प्रारंभी मुसळधार पावसाने नाशिकला चांगलेच झोडपले होते. चार-पाच तालुक्यात पावसाचा जोर इतका होता की, शेती पाण्याखाली बुडाली. सलग तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस कोसळल्याने गोदावरीसह जिल्ह्य़ातील बहुतांश नद्यांना पूर आला. नदी-नाले दुथडी भरून वहात होते. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल आधीच जाहीर झाला आहे.

जिरायती क्षेत्राला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. बागायती, फळपिकांचेही नुकसान झाले. चांदवड, येवला, नांदगाव, मालेगाव तालुक्यात पावसाचा जोर कमी असल्याने त्या भागात फारसे नुकसान झाले नव्हते. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानंतर कृषी विभागाने पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.

ग्रामसेवक, कृषी साहाय्यक यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी १५ दिवसांपासून पंचनाम्याच्या कामात गर्क आहेत. क्षेत्रनिहाय सविस्तर पंचनामे करण्यास वेळ लागतो. यामुळे या कामात आणखी आठ ते १० दिवसांचा अवधी लागणार आहे. नुकसानीचे सविस्तर पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्षातील नुकसान अंदाजापेक्षा अधिक आहे की नाही याची स्पष्टता होईल, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

१३ तालुक्यातील ७५८ गावांना फटका

मुसळधार पावसाने १३ तालुक्यांतील ७५८ गावे बाधित झाली. २१ हजारहून अधिक हेक्टरचे नुकसान झाले आहे. १३ तालुक्यांतील तब्बल ३२ हजार ४३३ शेतकऱ्यांना पुराची झळ बसली. इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक १० हजार ३४९ हेक्टर, तर कळवण तालुक्यात ०.६३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नाशिक तालुक्यात २५७३, देवळा ३४, पेठ ५५९, बागलाण ५३८, निफाड ६२१९, दिंडोरी ४००, त्र्यंबकेश्वर ६२०, सिन्नरमध्ये ५६१ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.