फेब्रुवारीपासून दररोज सेवा, वेळापत्रक जाहीर

नाशिक-दिल्ली विमान सेवा यशस्वी झाल्यानंतर उडाण योजनेंतर्गत दुसऱ्या टप्प्यात नाशिक-अहमदाबादची सेवा टू जेट फेब्रुवारीत कार्यान्वित करीत असताना आता अलायन्स एअर कंपनीही एक फेब्रुवारीपासून नाशिक-अहमदाबाद आणि हैद्राबाद या मार्गावर विमान सेवा देणार आहे. या सेवा दररोज असतील. नाशिकला हवाई सेवेची दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. आता एकाचवेळी दोन कंपन्या अहमदाबादसाठी सेवा देणार आहेत. पुढील काळात इतर महानगरांशीही नाशिक हवाई मार्गे जोडले जाण्याच्या मार्गावर आहे.

काही वर्षांतील कटू अनुभव बाजूला सारत नाशिकचे हवाई नकाशावरील स्थान नव्याने रोवण्याच्या दिशेने पावले पडू लागली आहेत. केंद्र शासनाच्या उडाण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नाशिक-अहमदाबाद आणि हैद्राबाद ही विमान सेवा फेब्रुवारीत सुरू होत आहे. नाशिक-दिल्ली विमानसेवा सुरळीत झाल्यानंतर देशातील इतर प्रमुख शहरांशी जोडणारी विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा केल्यामुळे हा विषय मार्गी लागल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले. नाशिक-अहमदाबाद दरम्यान विमान सेवा सुरू करण्याच्या प्रस्तावाला दोन महिन्यांपूर्वी हिरवा कंदील मिळाला होता. मात्र, प्रशासकीय कारणास्तव अहमदाबाद विमानसेवा लांबणीवर पडत होती. अलीकडेच या सेवेतील सर्व अडथळे दूर झाले.

टू जेट या कंपनीने १३ फेब्रुवारीपासून नाशिक-अहमदाबाद ही सेवा देण्याचे जाहीर केले आहे. या पाठोपाठ उपरोक्त मार्गासोबत नाशिक-हैद्राबाद मार्गावर अलायन्स एअर ही कंपनीही नव्याने सेवा देणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले. विमानातील आसनक्षमता ७० असून त्यातील ३५ आसन अनुदानित असल्याने सर्वसामान्य प्रवाशांनाही त्याचा लाभ होईल. नाशिक-अहमदाबाद हा ३६० किलोमीटरचा प्रवास आहे. दररोज सकाळी आठ वाजून ५५ मिनिटांनी ओझर विमानतळावरून विमान सुटणार असून ते अहमदाबादला १० वाजून १० मिनिटांनी पोहचेल तर अहमदाबाद येथून १० वाजून ४० मिनिटांनी विमान सुटणार असून ते ११.५५ मिनिटांनी ओझर विमानतळावर पोहचेल. हैद्राबादला जाण्यासाठी ओझर विमानतळावरून दुपारी १२.२० मिनिटांनी विमान सुटेल. ते दुपारी दोन वाजून २५ मिनिटांनी हैद्राबादला पोहचेल. हैद्राबादहून पावणे सातला विमान सुटणार असून ते साठेआठ वाजता नाशिकला पोहचेल.

टु जेट कंपनीने नाशिक-अहमदाबादसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यांचे विमान दररोज दुपारी १२ वाजता अहमदाबाद येथून सुटणार असून ते दुपारी एक वाजून १० मिनिटांनी ओझरला पोहचेल.  दोन वाजून १० मिनिटांनी ते अहमदाबाकडे मार्गस्थ होईल. या विमान सेवेमुळे राज्यातील व्यापार, उद्योगाला चालना मिळणार असल्याचा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला. एप्रिलपर्यंत नाशिक येथून भोपाळ, बंगळुरू, गोवा  शहरांसाठी विमानसेवा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

असे आहेत दर..

नाशिक-अहमदाबाद आणि हैद्राबाद या मार्गावर दररोज ही विमान सेवा राहणार आहे. या दोन्ही सेवेसाठी ७० आसन क्षमतेचे विमान वापरले जाईल. एकूण आसन क्षमतेपैकी निम्मी म्हणजे प्रत्येकी ३५ आसने उडाण योजनेंतर्गत अनुदानित असतील. ही तिकिटे प्रवाशांना सवलतीच्या दरात उपलब्ध राहणार आहेत. नाशिक-हैद्राबादसाठी सवलतीचे तिकीट २ हजार ९३० तर नाशिक-अहमदाबादसाठी २ हजार  ६० रुपयांचे असेल. पूर्वनोंदणी करणाऱ्या प्रवाशांना उपलब्धतेनुसार सवलतीचे तिकीट मिळेल. विनासवलत नाशिक-हैद्राबाद प्रवासासाठी ५ हजार ७१० आणि नाशिक-अहमदाबादसाठी ४ हजार ४५० रुपये तिकीट दर असतील.