10 April 2020

News Flash

ओझर दुरुस्ती केंद्राने नावलौकिक कायम ठेवावा    

‘सुखोई ३०’ ची दुरुस्ती, ‘मिग २९’ च्या नूतनीकरणाचा आढावा

ओझरच्या हवाई दल केंद्रात मानवंदना स्वीकारताना हवाई दलाच्या (देखभाल दुरुस्ती) विभागाचे एअर मार्शल शशिकर चौधरी.

एअर मार्शल शशिकर चौधरी यांची अपेक्षा * ‘सुखोई ३०’ ची दुरुस्ती, ‘मिग २९’ च्या नूतनीकरणाचा आढावा

नाशिक : सुखोई ३० एमकेआयची सखोल दुरुस्ती आणि मिग २९ चे नुतनीकरण यांचा आढावा हवाई दलाच्या (देखभाल दुरुस्ती) विभागाचे एअर मार्शल शशिकर चौधरी यांनी ओझर येथील देखभाल दुरुस्ती केंद्रातील भेटीत घेतला. या केंद्राने आजवर हाती घेतलेली कामे विहित मुदतीत पूर्ण केली आहेत. भविष्यात केंद्राने ही कार्यपध्दती अनुसरून हवाई दलाचे प्रमुख देखभाल दुरुस्ती केंद्र केंद्र म्हणून नावलौकिक कायम ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हवाई दलाच्या ओझरस्थित ११ व्या देखभाल-दुरुस्ती केंद्रात रशियन बनावटीच्या लढाऊ विमानांची देखभाल, दुरुस्तीचे काम चालते. काही वर्षांपूर्वी सुखोईच्या संपूर्ण देखभाल दुरुस्तीची व्यवस्था करण्यात आली. केंद्रात मिग २९ लढाऊ विमानाच्या नुतनीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. त्या अंतर्गत क्षेपणास्त्र वाहून नेण्याची अधिक क्षमता, इंधन टाकीची क्षमता वृध्दिंगत करताना हवेत इंधन भरण्याची खास व्यवस्थाही करण्यात आली आहे. या केंद्रात आतापर्यंत १४५ हून अधिक विमानांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या प्रहार क्षमतेत वाढ करणाऱ्या

केंद्रातील कामांचा आढावा चौधरी यांनी घेतला. चौधरी हे ओझर केंद्रात दोन दिवसाच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी हवाई दल पत्नी कल्याण संघटना (क्षेत्रीय) अध्यक्षा अनिता चौधरी उपस्थित होत्या. चौधरी यांचे केंद्राचे प्रमुख एअर कमांडोर पी. एस. सरीन, सोनिया सरीन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वागत केले. हवाई दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

देखभाल दुरुस्ती केंद्रात डेपोनिहाय चालणाऱ्या कामांची चौधरी यांनी पाहणी करून माहिती घेतली. अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. सुखोई ३० ची संपूर्ण दुरुस्ती आणि मिग २९ च्या नुतनीकरणाशी निगडीत विषयांवर चर्चा केली. केंद्रातील कामावर त्यांनी समाधान व्यक्त केले. देखभाल दुरुस्ती केंद्राच्या कामामुळे लढाऊ विमाने कार्यक्षम, प्रभावीपणे कार्यरत राहतात. केंद्रात तांत्रिक बाबी, देखभाल दुरुस्तीत हवाई सैनिकांनी उल्लेखनीय कामगिरी केली. देशातील देखभाल दुरुस्ती केंद्रांत ११ केंद्र हे महत्वाचे केंद्र आहे. ही श्रेष्ठता पुढेही कायम राखण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील रहावे, असे आवाहन चौधरी यांनी केले.

अनिता चौधरी यांनीही हवाई दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबियांसाठी असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचा आढावा घेतला. हवाई दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पत्नींसमवेत त्यांनी संवाद साधला. तसेच हवाई दल पत्नी कल्याण संघटना संचलित उम्मीद विद्या किरण विद्यालयास भेट दिली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 1:18 am

Web Title: air marshal shashikar choudhary visit aircraft repair depot in ojhar zws 70
Next Stories
1 बदलत्या आर्थिक घडामोडीत गुंतवणुकीचे नियोजन कसे कराल?
2 पेटवून घेतलेल्या जखमी महिलेचा मृत्यू
3 संस्था, सोसायटी स्थापून ठेवीदारांची फसवणूक
Just Now!
X