17 December 2017

News Flash

शिर्डी विमानसेवेमुळे नाशिकचे ‘उड्डाण’ अधांतरी

आरसीएसच्या यादीतून नाशिक विमानतळ वगळले जाणार होते.

खास प्रतिनिधी, नाशिक | Updated: October 3, 2017 3:46 AM

शिर्डी विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला काही अंशी खोडा बसू शकतो.

अनेकदा सुरू होऊन बंद पडलेली आणि नंतर पुन्हा नवनवीन योजनेंतर्गत सुरू होण्याची आशा बाळगणारी नाशिकची विमान सेवा शिर्डी विमानतळाच्या लोकार्पणानंतर अधांतरी बनण्याच्या मार्गावर आहे.

नाशिकच्या विकासाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ओझर विमानतळावर प्रवासी (टर्मिनल) इमारतीचे लोकार्पण होऊन तीन वर्षांहून अधिकचा काळ लोटूनही हवाई नकाशावर त्याचे अस्तित्व अधोरेखित होऊ शकले नाही. या काळात विमान सेवा सुरू करण्यासाठी काही प्रयोग झाले. परंतु, ते प्रवाशांचा प्रतिसाद, विमान सेवा शुल्क आदी कारणास्तव अपयशी ठरले. या घडामोडी घडत असताना मध्यंतरी प्रादेशिक कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून उडाण योजनेंतर्गत सरकारने दहा विमानतळांची निवड केली. त्यात नाशिक द्वितीय स्थानी आहे. या योजनेमुळे नाशिकहून विमानसेवा सुरू होण्याची आशा पल्लवित झाली. एअर डेक्कन कंपनीला नाशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे हे दोन मार्गही दिले गेले. ही विमानसेवा ३० सप्टेंबपर्यंत सुरू होणे अपेक्षित होते; परंतु मुंबईत विमान कंपनीला ‘स्लॉट’ न मिळाल्याने ही विमानसेवा लांबणीवर पडली. आरसीएसच्या यादीतून नाशिक विमानतळ वगळले जाणार होते.

विमान सेवा सुरू होईपर्यंत या यादीतून नाशिकला वगळू नये यासाठी पाठपुरावा केल्यामुळे आरसीएसच्या दुसऱ्या यादीत नाशिकचा समावेश झाला. त्यात जेट एअरवेज अणि एअर अलायन्स या कंपन्या अहमदाबाद-नाशिक-बंगरुळू या मार्गासाठी प्रयत्नरत होत्या. या घडामोडी घडत असताना शिर्डी विमानतळाचे लोकार्पण होऊन सेवा सुरू झाली आहे. शिर्डी-हैदराबाद नंतर देशातील प्रमुख महानगरे लवकरच शिर्डीशी विमान सेवेने जोडली जाणार आहे.

शिर्डीला दररोज ५० हजार भाविक भेट देतात. या स्थितीत विमान कंपन्या व्यावसायिक दृष्टिकोनातून नाशिकऐवजी शिर्डीला पसंती देण्याची अधिक शक्यता आहे. नाशिकहून साधारणत: १०० किलोमीटर अंतरावर शिर्डी आहे. त्यामुळे ज्या स्थानिकांना देशातील इतर भागात विमानप्रवास करावयाचा आहे, त्यांच्याकडून आता मुंबईऐवजी निकटच्या शिर्डीला प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. या स्थितीत नाशिकच्या ओझर विमानतळाला विमान कंपन्यांचा कितपत प्रतिसाद मिळेल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

खोडा बसण्याची शक्यता

शिर्डी विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यामुळे नाशिकच्या विमानसेवेला काही अंशी खोडा बसू शकतो. शिर्डी विमानतळावरून प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानाचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केल्यास ऑनलाइन व्यवस्थेत शिर्डी हे नाव दिसत नाही. उलट त्याऐवजी नाशिकजवळचे विमानतळ असा उल्लेख दिसतो. शिर्डीहून हैदराबादला विमानसेवा सुरू झाली. नाशिकची विमानसेवा सुरू करण्यासाठी उडाण योजनेंतर्गत आपण कोणती शहरे निवडतो ही बाब महत्त्वाची आहे. दिल्ली व अहमदाबाद या शहरांना नाशिक विमान सेवेने जोडले जाण्याची गरज आहे. उडाण योजनेंतर्गत राज्यातील दहा शहरांच्या यादीत नाशिक द्वितीय क्रमांकावर आहे.

– मंगेश पाटणकर, अध्यक्ष, निमा

विमानसेवेवरील ढग गडद

शिर्डीआधी नाशिकच्या ओझर विमानतळावरून विमान सेवा सुरू झाली असती तर ती स्थिरस्थावर होण्यास मदत झाली असती, पण शिर्डी विमानतळावरून सेवा सुरू झाल्यामुळे नाशिकच्या हवाई सेवेवरील ढग अधिक गडद झाले आहे. नाशिकहून एक ते दीड तासावरील अंतरावर विमानतळ झाल्यामुळे प्रवासी मुंबईऐवजी शिर्डीला जाण्यास प्राधान्य देतील. मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या विमानांसाठी स्लॉट मिळतो, पण नाशिकच्या विमानांसाठी मिळत नाही. या एकंदर स्थितीत ओझर विमानतळाचा वापर प्रामुख्याने कार्गोसाठी कसा होईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील फळ व भाजीपाल्याची निर्यात येथून व्हावी, असा प्रयत्न करावा लागेल.

– संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स

नाशिकच्या आशेवर परिणाम नाही

नाशिक येथील विमानसेवेची आखणी प्रामुख्याने उद्योजक आणि भाविकांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली आहे. त्यामुळे शिर्डी येथील विमानसेवा सुरू झाल्याचा फारसा परिणाम नाशिकच्या विमानसेवेवर होणार नाही. शिर्डी आणि नाशिकसाठी सोयीस्कर ठरेल, अशा सिन्नर तालुक्यासारख्या ठिकाणाचा विमानतळासाठी विचार होणे आवश्यक होते. तसे झाले असते तर ते आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले असते. शिर्डीला दररोज ५० हजार भाविक भेट देतात. नाशिकमध्ये उद्योग व्यवसाय आणि त्र्यंबकेश्वर व सप्तशृंगी गडावर येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

– खा. हेमंत गोडसे

First Published on October 3, 2017 3:46 am

Web Title: aircraft companies prefer shirdi flight service instead of nashik