छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण वर्गाचा समारोप
नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्राने आयोजित केलेल्या सीडीएस परीक्षा मार्गदर्शन वर्गात प्रशिक्षण घेतलेल्या अजय कदम आणि सुरक्षी गुप्ता यांची सैन्यदलात अधिकारी म्हणून निवड झाली आहे.
या वर्गाच्या समारोप कार्यक्रमात ही माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय माहिती उपसंचालक सतीश लळीत उपस्थित होते. त्यांनी व केंद्राचे प्रभारी अधिकारी ले. कर्नल दिलीप गोडबोले यांनी यशस्वी प्रशिक्षणार्थींचे अभिनंदन केले.
पुण्याच्या सैनिक कल्याण विभागांतर्गत असलेल्या या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये १७ नोव्हेंबर २०१५ ते ३० जानेवारी २०१६ या कालावधीत ७५ दिवसांचा हा वर्ग कंबाइंड डिफेंस सव्‍‌र्हिसेस परीक्षेची पूर्वतयारी म्हणून घेण्यात आला. चार युवती व २४ युवक याप्रमाणे २४ जणांची या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती.
या वर्गात विद्यार्थ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या सीडीएस परीक्षेसाठी विशेष तयारी करून घेण्यात आली.
त्यामुळेच या केंद्रातील प्रशिक्षण घेतलेले अजय कदम व सुरक्षी गुप्ता यांची सैन्यदलात अधिकारी म्हणून निवड झाली असून ते सध्या अंतिम गुणवत्ता यादीच्या प्रतीक्षेत आहेत.
केंद्राचे प्रभारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल दिलीप गोडबोले यांनी केंद्रात सीडीएस परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी वर्षांतून दोन वर्ग घेतले जात असले तरी भविष्यात वर्षांतून तीन वर्ग घेण्याचा मानस असल्याचे नमूद केले. प्रशिक्षणार्थीना निवास व भोजन व्यवस्था सैनिक कल्याण विभागाकडून विनामूल्य केली जाते.
महाराष्ट्रातील अधिकाधिक युवकांनी या विनामूल्य सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक (दूरध्वनी ०२५३-२४५१०३१ व २४५१०३२) येथे संपर्क साधावा.