बांधकाम व्यावसायिकावर विक्रेत्यांचा रोष

उच्चभ्रु वसाहतीतील आरक्षित भूखंडावर बांधकाम व्यावसायिकाने सोमवारी मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करत आणि मोठे कंटेनर आणून या जागेवरील भाजी बाजार बंद पाडल्याची तक्रार गंगापूर रस्त्याजवळील आकाशवाणी भाजी विक्रेते मंडळाने केली आहे. अचानक करण्यात आलेल्या  या कार्यवाहीविरोधात विक्रेत्यांनी आमरण उपोषण सुरू केले.

आकाशवाणी केंद्रासमोरील या जागेचा विषय काही महिन्यांपासून गाजत आहे. बांधकाम व्यावसायिकाने मध्यंतरी याच परिसरातील एका भूखंडावर काम सुरू केले असता स्थानिकांनी विरोध करून ते बंद पाडले होते. तेव्हापासून शांत राहिलेला हा विषय भाजी बाजाराच्या जागेवरील घडामोडींनी पुन्हा चर्चेत आला. एसटी कॉलनीलगतच्या आरक्षित जागेवर दररोज सायंकाळी भाजी बाजार भरतो. बाजारालगत निवासी वस्ती, जॉगिंग ट्रॅक आहे. विक्रेत्यांकडून फेकला जाणारा खराब भाजीपाला, बाजारातील गर्दीमुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी असे काही प्रश्न स्थानिकांना भेडसावत आहेत. सोमवारी सायंकाळी या ठिकाणी नेहमीप्रमाणे बाजार भरल्यानंतर  मध्यरात्री बाजाराची जागा खणण्याची कृती करण्यात आल्याची तक्रार  भाजी विक्रेता मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. रात्री दोनच्या सुमारास दोन ते तीन जेसीबींच्या सहाय्याने बाजाराच्या जागेवर खड्डे खोदले गेले. मालमोटारींच्या सहाय्याने लोखंडी कंटेनर आणण्यात आले. रस्त्यालगत ते आडव्या पध्दतीने रचण्यात आले. जेणेकरून या परिसरात कोणाला प्रवेश किंवा व्यवसाय करता येणार नाही, अशी तजविज केल्याचे दिसून येते. रात्रीच्या सुमारास झालेल्या कामामुळे स्थानिकांना आवाजाचा त्रास सहन करावा लागला, याकडे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. मंगळवारी या घटनाक्रमाची माहिती सर्वत्र पसरली. अनेक भाजी विक्रेते दाखल झाले. काही दिवसांपूर्वी पालिकेने या ठिकाणी ‘हॉकर्स झोन’चा फलक उभारला होता. सुमारे १५० विक्रेत्यांना भूखंडावर भाजी विक्रीसाठी जागा निश्चित करून देण्यात आली. या परिस्थितीत बांधकाम व्यावसायिकाने कोणतीही पूर्वसूचना न देता भाजी बाजार बंद पाडल्याची तक्रार विक्रेत्यांनी केली. या कार्यवाहीच्या निषेधार्थ विक्रेत्यांनी आमरण उपोषण सुरू केले.

आकाशवाणी केंद्रासमोरील उपरोक्त जागेत पालिका बाजार, क्रीडांगण आणि वाहनतळाचे आरक्षण आहे. समावेशक आरक्षणांतर्गत पालिका बाजाराची इमारत बांधकाम व्यावसायिकाने विकसित करणे बंधनकारक आहे. ही इमारत बांधून महापालिकेकडे हस्तांतरीत होत नाही, तोवर याच परिसरातील त्याच्या अन्य इमारतीला पूर्णत्वाचा दाखला मिळणार नाही, असा २०११ मध्ये महापालिका-संबंधित व्यावसायिक यांच्यात करार झाला होता. २०१७ पर्यंत संबंधिताने काही काम केले नाही. याच काळात त्या प्रकरणाची पुनर्पडताळणी करण्यात आली. व्यापारी संकुलाचे काम पूर्ण करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार संबंधिताने हे काम सुरू केले आहे.

– नगररचना विभाग, महापालिका

उपरोक्त भाजी बाजारात एकाच विक्रेत्याने चार ते पाच दुकाने थाटलेली होती. काही दिवसांपूर्वी महापालिकेने एका कुटुंबाला एक यानुसार त्या ठिकाणी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. फेरीवाल्यांसाठी बांधकाम व्यावसायिक इमारतीसह ओटे बांधून देणार आहे. महापालिकेशी झालेल्या करारानुसार त्या जागेचा विकास करून देणे त्याला बंधनकारक आहे. इमारतीचे काम तो कधी सुरू करणार हे स्पष्ट नव्हते. ते आता सुरू झाले आहे.

– पश्चिम विभाग, महापालिका

आकाशवाणी केंद्रासमोरील संबंधित जागा आमची आहे. त्या ठिकाणी महापालिकेशी निश्चित झाल्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे.

– जितुभाई ठक्कर (ठक्कर डेव्हलपर्स)