News Flash

संमेलनाच्या नियोजनासाठी एक खिडकी योजना

शहरातील गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणाऱ्या संमेलनाची लगबग सुरू झाली आहे.

संमेलनात समाजकंटकांकडून गालबोट लागू नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना शहर पोलीस करणार आहेत.

पोलीस आयुक्तालयातही सल्लागार समितीची स्थापना

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरात २६ ते २८ मार्च या कालावधीत होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणारे विविध कार्यक्रम, ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शनातील कक्ष, वाहनतळ आदींच्या नियोजन आणि विविध परवानग्या देण्यासाठी शहर पोलिसांनी एक खिडकी योजना राबविण्याचे जाहीर केले आहे. संमेलनात समाजकंटकांकडून गालबोट लागू नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना शहर पोलीस करणार आहेत.

शहरातील गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होणाऱ्या संमेलनाची लगबग सुरू झाली आहे. अलीकडेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पहिली आढावा बैठक पार पडली होती. यावेळी संमेलनाच्या नियोजनासाठी शासकीय विभागांनी समन्वयासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे भुजबळ यांनी सूचित केले होते. राज्यासह देशभरातून येणाऱ्या साहित्यप्रेमींच्या नियोजनात कोणतीही कसर राहू नये याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच संमेलन काळात कोणतीही आंदोलने व्हायला नकोत यावर बैठकीत चर्चा झाली होती. विविध विभागांची समन्वयासाठी बैठक आयोजित करण्याचे पालकमंत्र्यांनी सूचित केले होते. त्या अनुषंगाने मराठी साहित्य संमेलन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाने सल्लागार समितीची स्थापना केली आहे.

साहाय्यक पोलीस आयुक्त नवलनाथ तांबे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सल्लागार समितीत पोलीस आयुक्तालय, जिल्हा प्रशासन, महापालिका, कामगार कल्याण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, प्रादेशिक परिवहन विभाग, अन्न-औषध प्रशासन यांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि साहित्य संमेलन आयोजक मंडळाचे दोन प्रतिनिधी (एक महिला) असे सदस्य राहणार आहेत. या सल्लागार समितीच्या माध्यमातून मराठी संमेलन आयोजनातील कार्यक्रमांना परवाना देणे, मिरवणूक, ग्रंथ दिंडी यासाठी परवानगी, भोजन आणि ग्रंथ दालनातील कक्ष सुरळीत करणे, त्यांना परवाना देणे, वाहनतळ व्यवस्थेचे नियोजन आदींवर काम केले जाणार आहे. सल्लागार समितीकडून सुचविण्यात आलेल्या अन्य महत्त्वाच्या परवानग्या आणि बाबींना मान्यता देण्यासाठी एक खिडकी योजना राबविली जाणार आहे.

समितीतील सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयातील प्रतिनिधींची नांवे शुक्रवापर्यंत पोलीस आयुक्त कार्यालयात मागविण्यात आली आहे. कुसुमाग्रज नगरी या संमेलन स्थळी साहित्य रसिकांची मोठी गर्दी होणार आहे. संमेलनास समाजकंटकांकडून गालबोट लागू नये म्हणून पोलीस यंत्रणेला खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून समिती काम करणार आहे. दरम्यान, संमेलनासाठी आयोजकांनी आधीच सल्लागार समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांसह आरोग्य विज्ञान आणि मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंचा समावेश आहे.

कामकाजाचा नियमित आढावा

साहित्य संमेलन सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त सल्लागार समितीची आठवडय़ातून एक किंवा दोन वेळा बैठक घेण्यात येईल. त्यात सल्लागार समितीच्या कामकाजाचा मराठी साहित्य संमेलनाची रूपरेषा, कार्यक्रमाच्या अनुषंगाने समिती सदस्य पोलीस आयुक्त दीपक पाण्डय़े यांना नियमित माहिती देणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 1:12 pm

Web Title: akhil bharatiya marathi sahitya sammelan single window facility for proper planning dd70
Next Stories
1 साहित्य संमेलन स्थळास सावरकरांचे नाव न दिल्याने आयोजकांचा निषेध
2 राज्यपालांच्या दौऱ्यात शासकीय यंत्रणांची कसरत
3 आर्थिक तरतुदीची शक्यता मावळली
Just Now!
X