जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी पहाटे मद्यपी रुग्णाने दुसऱ्या मजल्यावर गादी व उशी पेटवून खिडक्यांची तोडफोड करीत धुडगूस घातला. नंतर या रुग्णाने फुटलेल्या काचेद्वारे स्वत:वर वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. या एकंदर घडामोडींमुळे रुग्णालय कर्मचारी आणि इतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. वारंवार घडणाऱ्या या घटनांच्या निषेधार्थ शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्यामुळे दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले. पोलीस अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर दुपारी हे आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्हा रुग्णालयात उपचाराच्या कारणावरून नातेवाईकांकडून कायम गोंधळ घातला जातो. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीचे प्रकार याआधी घडले आहेत. त्यात रुग्णाच्या गोंधळाची नव्याने भर पडली. ईस्माईल शेख असे या रुग्णाचे नाव आहे. दुसऱ्या मजल्यावरील पुरूष कक्षालगतच्या विशेष कक्षात व्यसनाधीन रुग्णांना ठेवले जाते. शेख या ठिकाणी उपचार घेत होता. पहाटे तीनच्या सुमारास शेखने पलंगाची मोडतोड करीत गादी पेटविली. जळती गादी हातात घेऊन तो बाहेर पळाला. अचानक झालेल्या गोंधळामुळे एकच गोंधळ उडाला. गाढ झोपेत असणारे रुग्ण भयभीत झाले. कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन शेखला कसेबसे नियंत्रणात आणले आणि त्याला कक्षात नेले. या ठिकाणी फुटलेली काच घेऊन त्याने स्वत:वर वार करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या शेखवर सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, रुग्णालय कर्मचाऱ्यांना वारंवार अशा दहशतीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांनी सकाळपासून रुग्णालय प्रवेशद्वारावर ठिय्या देत कामबंद आंदोलन सुरू केले. यामुळे रुग्णालयातील दैनंदिन कामावर परिणाम झाला. साहाय्यक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, जिल्हा शल्यचिकित्सक जगदाळे यांनी कामगारांची समजूत काढली. त्यानंतर कर्मचारी कामावर हजर झाले.