14 December 2019

News Flash

नाटय़ परिषद शाखेची ठरावीक चौकटीतच धडपड

नवीन रंगकर्मी मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत

(संग्रहित छायाचित्र)

नवीन रंगकर्मी मार्गदर्शनाच्या प्रतीक्षेत

चारुशीला कुलकर्णी, नाशिक

नवोदित रंगकर्मीना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, कलेचे विविध पैलू उलगडणे या हेतूने सुरू झालेली अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची नाशिक शाखा सध्या निद्रित अवस्थेत आहे. नाटय़ परिषदेचा कारभार अंतर्गत राजकारण, कंपूशाही, नैमित्तिक पुरस्कार, रंगभूमी दिन, बाल नाटय़ शिबिरे तसेच एकांकिका स्पर्धा या ठरावीक चौकटीबाहेर जात नसल्याने नव्या रंगकर्मीना अन्य मार्गदर्शकांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे नाटय़ परिषदेने आता कात टाकावी, अशी अपेक्षा सांस्कृतिक वर्तुळात करण्यात येत आहे.

रंगभूमीवरील वेगवेगळ्या पैलूंचा कलावंतांना अभ्यास करता यावा, त्यांची रंगभूमीशी जोडलेली नाळ कायम राहावी यासाठी अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद महत्त्वाची भूमिका निभावत आहे. सभासद तसेच नाटय़प्रेमींची अभिरुची जपण्याच्या अनुषंगाने नाटय़ परिषदेने विविध कार्यक्रमांचा नजराणा पेश करणे अपेक्षित असताना काही वर्षांपासून नाटय़ परिषद नाशिक शाखेला कंपूशाहीने घेरले आहे. नाटय़ परिषदेचा कारभार त्यामुळे अंतर्गत राजकारण तसेच अन्य काही कारणांमुळे केवळ वि. वा. शिरवाडकर नाटय़ लेखन, वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार सोहळा, बालनाटय़ शिबीर, राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगभूमी दिन अशा ठरावीक कार्यक्रमांमध्ये अडकला आहे. या उपक्रमांची परिषदेच्या वतीने फारशी प्रसिद्धी होत नसल्याने बऱ्याचदा प्रेक्षकांचीही वानवा असते. परिषदेच्या सभागृहातच नवोदित रंगकर्मीना आपली संहिता सादर करण्यासाठी ‘नाटय़ अभिवाचन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. या कार्यक्रमास नाटय़ परिषदेचे काही पदाधिकारी आणि अभिवाचन करणारे, असे बोटावर मोजण्याइतकेच उपस्थित राहत.

महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणामुळे कार्यक्रम बंद पडला. दीड वर्षांपासून हा कार्यक्रम बंद असल्याने नाटय़ परिषदेच्या कार्यालयात पदाधिकारी वगळता कोणी फारसे फिरकत नाही. नाटय़ परिषदेने आपली चौकट ओलांडत रंगकर्मीना मार्गदर्शन करण्यासाठी विविध कार्यक्रम सुरू करावेत अशी मागणी सांस्कृतिक वर्तुळातून होत आहे. नाटय़ परिषदेच्या  उदासीनतेमुळे महाविद्यालयीन हौशी रंगकर्मीना व्यावसायिक नाटय़संस्थांचा आधार घेत पदरमोड करत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये सहभाग नोंदवावा लागत आहे. अभिनयासह काही तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन मिळत नसल्याने राज्यपातळीवर नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात अपवाद वगळता ठळक कामगिरी नाही. हे.

कालिदासच्या नूतनीकरणामुळे अभिवाचनचा कार्यक्रम बंद होता. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून हा कार्यक्रम पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती नाटय़ परिषद नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी दिली.

नव्या बदलाचा स्वीकार करावा

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद नाशिक शाखा आपली ठरावीक चौकट मोडायला तयार नाही. येथील सर्व मंडळी नाटय़ क्षेत्रात प्रस्थापित आहेत. ही मंडळी नव्या मंडळीचा लवकर स्वीकार करत नाही. वाद होत राहतात, पण रंगकर्मीना मार्गदर्शन हवे आहे. याचा कुठे तरी विचार व्हावा ही अपेक्षा.

– अपर्णा क्षेमकल्याणी

First Published on March 13, 2019 3:41 am

Web Title: all india marathi natya parishad branch in nashik in inactive
Just Now!
X