News Flash

महामार्ग, स्मार्ट सिटी विरोधात सर्वपक्षीय एकी

शेतकरी मेळाव्यात खासदारांसह आमदारांचा आंदोलन करण्याचा इशारा

उंबरकोन फाटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात भूमिका मांडताना खासदार हेमंत गोडसे. समवेत आ. निर्मला गावित, आ. राजाभाऊ वाजे व इतर (छाया- जाकीर शेख)

शेतकरी मेळाव्यात खासदारांसह आमदारांचा आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग व घोटी परिसरातील नियोजित स्मार्ट सिटी प्रकल्पास विरोध करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पाश्र्वभूमीवर घोटी-सिन्नर महामार्गावरील उंबरकोन फाटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात खा. हेमंत गोडसे, आ. निर्मला गावित, आ. राजाभाऊ  वाजे आदींसह आजी-माजी आमदार व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी भूमिका मांडली. इगतपुरी व सिन्नर तालुक्यांतील शेतकरी या प्रस्तावित प्रकल्पात भरडला जाणार असल्याने त्यांनी या महामार्गाला व स्मार्ट सिटीला कडाडून विरोधास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या भूमिकेशी आम्ही सर्व नेते बांधील राहू, त्यासाठी प्रसंगी आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा खासदारांसह आमदारांनी दिला.

यापूर्वीच तालुक्यातील ७५ टक्के जमीन इतर प्रकल्पांसाठी शासनाने संपादित केल्याने आता या प्रकल्पासाठी हजारो हेक्टर जमीन संपादित झाल्यास तालुक्यातील शेतकरी समूळ नष्ट होण्याची भीती मेळाव्यात व्यक्त करण्यात आली. शासनापुढे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने शासनाने हा प्रस्तावित महामार्ग तसेच घोटी, कवडधरा येथील स्मार्ट सिटीचा प्रस्ताव रद्द करून या आदिवासी तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली.

या वेळी खा. गोडसे यांनी यापूर्वीही या प्रस्तावित महामार्गाला आपल्यासह आमदार निर्मला गावित, राजाभाऊ  वाजे यांनी विरोध केला असल्याचे निदर्शनास आणून दिले. शेतकऱ्यांनी आपली संघटित भूमिका व हा प्रकल्प हटावोचा नारा कायम ठेवावा. शेतकरी जी भूमिका घेतील तीच आमची भूमिका राहून वेळ पडली तर या प्रकल्पाविरोधात आंदोलनांचा अवलंब करण्यात येईल. सर्वपक्षीय तालुका अध्यक्षांनी विभागीय अधिकारी व जिल्हा अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ नेण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही गोडसे यांनी केली. आ. निर्मला गावित यांनी महामार्गाच्या प्रस्तावाला आपला सुरुवातीपासूनच विरोध असून यापुढेही विरोध कायम राहील, असे सांगितले. शेतकऱ्यांच्या भावना व भूमिका शासनदरबारी मांडण्यात येईल.

काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या ताकदीवर हा महामार्ग व स्मार्ट सिटीचा प्रस्ताव हद्दपार करण्यास शासनास भाग पाडू, अशी ग्वाही त्यांनी दिली. आ. वाजे यांनी आपण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असल्याने शेतकऱ्यांची जी भूमिका तीच आपली भूमिका राहील, असे नमूद केले. शेतकऱ्यांनी पक्षभेद, राजकीय जोडे बाजूला ठेवून संघटितपणे आपली भूमिका कायम ठेवावी. शेतकरी व जमीनदारांच्या पुढच्या पिढीसाठी जमीन वाचविणे महत्त्वाचे असून आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करत असल्याने शेतकरी जो निर्णय घेतील त्यासाठी आम्ही बांधील राहणार, अशी भूमिका मांडली.

या वेळी माजी आमदार शिवराम झोले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव, माजी सभापती संपत काळे, मनसे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड. रतनकुमार इचम, माजी आमदार पांडुरंग गांगड, मेळाव्याचे प्रवर्तक कचरू डुकरे आदींनीही आपले मत मांडले. सर्वपक्षीय पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, २२ गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य मेळाव्यास उपस्थित होते.

शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा डाव

प्रस्तावित मुंबई-नागपूर महामार्गात आ. गावित, माजी आमदार पांडुरंग गांगड, शिवराम झोले यांचीही जमीन जाणार असल्याचे या मेळाव्यात नमूद करण्यात आले. आ. वाजे यांची जमीन यापूर्वीच नाशिक-मुंबई महामार्गासाठी संपादित करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. मेळाव्यात कायदेशीर लढाई व त्याबाबतचे नियोजन करण्यासाठी अ‍ॅड. रतनकुमार इचम यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली असून शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्यासाठी व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी इगतपुरी तालुका वकील संघ सर्वतोपरी सहकार्य करणार, कायदेशीर बाबींसाठी आपण स्वत: पुढाकार घेणार, अशी ग्वाही इचम यांनी दिली. याआधी इगतपुरी तालुक्यातून विविध प्रकल्पांसाठी हजारो हेक्टर जमीन संपादित झाली असून आताही या समृद्धी एक्स्प्रेससाठी हजारो हेक्टर जमीन संपादित होणार असल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा डाव शासन रचत आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती मनसेचे उपजिल्हा अध्यक्ष संदीप किर्वे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2016 1:46 am

Web Title: all political parties protest smart city project
Next Stories
1 के. के. वाघ गणेशोत्सवात ४३१ विद्यार्थ्यांचे रक्तदान
2 गणेश मंडळांसाठी फुकट ते पौष्टीक
3 पॉवरग्रिडविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
Just Now!
X