नाशिक : कोणत्याही खात्यावरून कोणत्याही पक्षाचे घोडे अडलेले नाही. खातेवाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असून ते पूर्ण झालेले आहे. ३० डिसेंबरला दुपारी १२ ते एक दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. त्यात बदल होणार नाही. कोणतेही खाते कोणत्याही मंत्र्याकडे असले तरी त्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडेच असतात, असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारास होणारा विलंब, तीन पक्षातील चढाओढ याविषयी उपस्थित प्रश्नांवर विस्ताराचे घोडे कुठे अडलेले नाही, तर ते उधळलेले असल्याचे नमूद केले. सरकारमध्ये सहभागी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. महाविकास आघाडी सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ मातोश्रीवरून सिल्व्हर ओककडे गेल्याच्या प्रश्नावर राऊत यांनी रिमोट कंट्रोल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या हातात शोभत होता, असे सांगितले. शरद पवार यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. सरकार चालविताना त्यांचे मार्गदर्शन, सूचना आम्ही नक्कीच घेणार. केंद्र सरकारने मंजूर केलेला राष्ट्रीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि नागरिकत्व नोंदणीवरून देशात उद्भवलेल्या स्थितीबाबत हिंसाचार का होतोय, तो घडविण्यामागे प्रेरणा कुणाची आहे, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.