३५ लाख भाविक आल्याचा अंदाज
याआधीच्या दोन पर्वण्यांच्या तुलनेत अखेरच्या तिसऱ्या शाही पर्वणीत त्र्यंबक नगरीत भाविकांचा अक्षरश: जनसागर उसळल्याचे दिसून आले. प्रचंड गर्दीला नियंत्रित करताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. कुशावर्त तीर्थावर टप्प्याटप्प्याने भाविकांना सोडण्याचा मार्ग अवलंबिण्यात आला तरी त्र्यंबकमधील सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत असल्याने पोलीस हतबल झाल्याचेही काही प्रसंग उद्भवले. दुपारनंतर स्नानासाठी सहा ते आठ तासांचा कालावधी लागू शकतो, अशी ध्वनीक्षेपकमार्फत प्रशासनाकडून भाविकांना परिस्थितीची कल्पना देण्यात आली. नाशिकचे पालक मंत्री गिरीश महाजन यांनी तब्बल ३५ लाख भाविक दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त केला.
२१ व्या शतकातील दुसऱ्या कुंभमेळ्यातील अखेरच्या शाही स्नानावेळी भाविकांची अशी काही गर्दी होईल याची कल्पना प्रशासनाने केली नसावी. पहाटेपासून भाविकांचे लोंढे नाशिकहून त्र्यंबकमध्ये धडकू लागले. साधू-महंतांचे शाही स्नान व मिरवणुकीवेळी गर्दीचे व्यवस्थापन अवघड ठरेल हे लक्षात घेऊन नाशिकहून त्र्यंबकला येणारी वाहतूक दुपारी १२ ेपर्यंत थांबविण्यात आली. जेव्हा ही वाहतूक सुरू झाली, तेव्हा जत्थेच्या जत्थे त्र्यंबक नगरीत दाखल होऊ लागले. ही गर्दी इतकी वाढली की पोलिसांना नगरीत ठिकठिकाणी लोखंडी जाळ्या लावून नियंत्रण करणे भाग पडले. टप्प्याटप्प्याने भाविकांना सोडताना एक टप्पा पार करण्यास २० मिनिटे ते अर्धा तासाचा कालावधी लागत होता. लोखंडी जाळीच्या मागे थांबलेले भाविक कमालीचा आरडाओरड करत होते. भाविकांना सोडल्यानंतर पुढील टप्प्यालगत पोहोचताना बहुतांश पळत निघाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण होत होती. संबंधितांनी पळू नये, असे आवाहन पोलीस यंत्रणेला करावे लागले. एरवी, कुशावर्त परिसरात पोलिसांच्या शिट्टय़ांचा कानी पडणारा आवाज आज संपूर्ण नगरी आणि आसपासच्या रस्त्यांवर घूमत होता. दस्तुरखुद्द पालक मंत्री गिरीश महाजन हेही भाविकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करीत होते.
भाविक खुष्कीच्या मार्गाने आत जाण्याचा प्रयत्न करत होते. गर्दी वाढत असल्याने भाविकांना स्नानासाठी सहा ते आठ तास लागू शकतात, असे आवाहन पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत भाविकांचा ओघ सुरूच होता.