18 July 2019

News Flash

नाल्यांमध्ये रासायनिक सांडपाणी

दोषी उद्योगांवर कारवाईची सूचना

अंबड औद्योगिक वसाहतीतून नंदिनी नदीला मिळणाऱ्या नाल्यात पिवळ्या रंगाचे पाणी सोडले जाते

दोषी उद्योगांवर कारवाईची सूचना

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतून नंदिनी नदीला मिळणाऱ्या नाल्यात पिवळ्या रंगाचे पाणी सोडले जाते, तर सद्गुरूनगर येथील नाल्यात काळ्या रंगाचे पाणी आढळले. हे पाणी रासायनिक सांडपाणी असल्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषित पाणी नाल्यात सोडणाऱ्या उद्योगाचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी सूचना मंडळाच्या अखत्यारीत गठित झालेल्या उपसमितीने केली आहे. उपसमिती सदस्यांच्या पाहणीत काही धक्कादायक बाबी उघड झाल्या. तसेच काही उद्योगांचे रासायनिक सांडपाणी प्रक्रियेचे नेटके नियोजन पाहायला मिळाले.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी प्रदूषण नियंत्रणाचे काम प्रभावीपणे होण्यासाठी महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा परिषद, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, विभागीय माहिती कार्यालय यांच्या स्तरावर वेगवेगळ्या पाच उपसमित्यांची स्थापना करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ उपसमितीच्या पाहणी दौऱ्याची माहिती याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी दिली. महिंद्रा कारखान्याने रासायनिक सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे चांगले नियोजन केल्याचे दौऱ्यात आढळले.

नीलव मेटल्स कारखान्यातील सांडपाणी प्रकल्प असमाधानकारक असल्याचे ‘निरी’च्या सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. सद्गुरूनगर येथील नाल्यात काळे पाणी आढळले. त्यात रासायनिक सांडपाणी मिसळत असल्याचा संशय आहे. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. तूर्तास हे पाणी अडवून ते मलजल प्रक्रिया केंद्रात वळविण्यात आले. उपसमितीला कृपा कारखान्याचे काम समाधानकारक आढळले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार औद्योगिक वसाहतीत रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला जात असल्याची माहिती उपसमितीने घेतली.

अंबड औद्योगिक वसाहतीत आर्मस्ट्राँग कारखान्याच्या मागच्या बाजूला नंदिनीला मिळणारा नाला आहे. त्यातून पिवळ्या रंगाचे पाणी वाहते. त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाने हे पाणी सोडणाऱ्या कारखान्यावर कारवाई करावी, असे निर्देश उपसमितीने दिले. याच नाल्यात पालिकेचे चेंबरही तुंबल्याचे दिसून आले. २४ तासात त्याची दुरुस्ती करण्याचे पालिकेने मान्य केले. आयटीआय पुलालगत वाहिनीतील सांडपाण्याची गळती पालिकेने थांबविल्याचे आढळले. नदी पात्रातील सांडपाण्याचा प्रवाह पहिल्यापेक्षा कमी झाल्याचे उपसमितीचे निरीक्षण आहे. याच पध्दतीने नंदिनीत मिसळणारे सर्व सांडपाणी थांबवावे, असे सूचित करण्यात आले. पाहणी दौऱ्यात ‘निरी’चे कोमल के., कृतिका दळवी, पालिकेचे नितीन पाटील, राजेश शिंदे, एमआयडीसीच्या मोना भुसारे, संजय सानप, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ए. एम. कारे आणि राजेश पंडित यांचा समावेश होता.

औद्योगिक क्षेत्रातील घरगुती सांडपाणी नाल्यांमध्ये

अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीत घरगुती सांडपाण्याचे व्यवस्थापन होत नाही. त्यामुळे सर्व सांडपाणी नाल्यांमधून उपनद्या आणि नंतर गोदावरीत येते. त्यामुळे महापालिका आणि एमआयडीसीने एकत्रितपणे हा प्रश्न सोडविण्याचे निश्चित झाले. तसेच निवासी वसाहती, औद्योगिक वसाहतीतील कारखाने, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अखत्यारीत सर्व ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करण्याचे ठरविण्यात आले आहे.

First Published on March 13, 2019 3:32 am

Web Title: ambad industrial colony chemical waste in the drains