सरकारी अनास्थेमुळे आदिवासी दुर्गम भागातील तीन बालकांचा मृत्यू

महिला व बालके यांच्यासाठी सरकार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या माध्यमातून सक्रिय असले तरी या योजना प्रत्यक्ष किती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात हा प्रश्न आहे. त्याची प्रचिती त्र्यंबकेश्वर तालुक्यात आली.

नवजात बालकांवर उपचारासाठी त्यांना नाशिकमध्ये आणण्याकरीता सरकारी अनास्थेमुळे रुग्णवाहिका पाठविण्याऐवजी मालवाहू वाहन पाठविण्यात आले. यामुळे त्र्यंबकेश्वरच्या आदिवासी दुर्गम भागातील तीन नवजात शिशु दगावले.

देवगावच्या रायपाडा परिसरातील संगीता वारे (३०) या आदिवासी महिलेने जननी शिशु सुरक्षासह अन्य काही योजनांचा लाभ मिळावा यासाठी गावातील अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्यां यांच्याकडे नाव नोंदविले. संबंधितांनी याची कागदोपत्री नोंद घेतली असली तरी प्रसुतीपूर्व काळात आवश्यक चाचण्या, औषधे, तपासण्या, सोनोग्राफी, लसीकरण तसेच अमृत आहार योजनेचा लाभ यापैकी कोणत्याही योजनेचा लाभ त्या महिलेला झाला नाही. सोमवारी सायंकाळपासून तिला प्रसुतीपूर्व वेदना सुरू झाल्या.

याबाबत तिने अंगणवाडी कार्यकर्तीला दूरध्वनीवरून कल्पना दिली. मात्र संबंधित महिला बाहेरगावी असल्याने तिने आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याची सूचना केली. त्या महिलेने पदरमोड करत आरोग्य अधिकाऱ्यांना दूरध्वनी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

वास्तविक जिल्हा रुग्णालयाची १०८ रुग्णवाहिका आली असती तर बालकांवर वेळेत काही अंशी उपचार सुरू झाले असते. मात्र मालवाहू गाडीतून नेत असतांनाच त्या बालकांचा मृत्यू झाला. सरकारी अनास्थेने हताश झालेली माऊली बालकांचे कलेवर आपल्या पदरात घेत तशीच घरी परतली.

दरम्यान, या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी श्रमजीवी संघटनेने प्रयत्न केला. या बाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देत या संपुर्ण प्रकाराची सखोल चौकशी करत दोषींवर बाल हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बालकांना वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आरोग्य सेवेसाठी संघर्ष

दरम्यान, मंगळवारी या महिलेने तीन बालकांना घरीच जन्म दिला. त्यात दोन मुले व एक मुलगी यांचा समावेश होता. मात्र प्रसुतीनंतर तरी बालकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी तिचा संघर्ष सुरू राहिला. या कालावधीत आरोग्य अधिकाऱ्यांशी बुधवारी संपर्क झाला. त्यांनी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका पाठविण्याऐवजी तेथील आशा कर्मचाऱ्याच्या पतीचे मालवाहू वाहन त्या बालकांना जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी सायंकाळी पाठविले.

या संपुर्ण प्रकाराची सखोल चौकशी करत दोषींवर बाल हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बालकांना वेळेत उपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता. श्रमजीवी संघटना