सोशल नेटवर्किंग फोरम काही वर्षांपासून जिल्ह्य़ातील आदिवासी पाडय़ांना टँकरमुक्त करण्याचे काम करत आहे. या कार्यात अ‍ॅडव्हान्स एन्झाइम्स कंपनीने सीएसआर योजनेंतर्गत पाच लाख ३५ हजार रुपयांचे योगदान दिले आहे. अमेरिकेत स्थायिक असलेले वसंत राठी, त्यांचे बंधू किशोर राठी आणि सीएसआर प्रमुख मुकुंद काबरा यांच्या प्रयत्नातून ही देणगी फोरमला मिळाली. या निधीतून आदिवासी भागातील एका गावचा पाणीप्रश्न सोडवला जाणार आहे.

मूळचे येवला येथील राठी बंधूंचा अ‍ॅडव्हान्स एन्झाइम्स या नावाने शेतीला पूरक जैवक बनवण्याचा उद्योग आहे. या उद्योगाचे जाळे युरोप, अमेरिकेत उभारण्यासाठी वसंत राठी अनेक वर्षे अमेरिकेत स्थायिक आहेत. तर किशोर राठी स्थानिक कामकाज बघतात. सोशल फोरमचे अमेरिकेतील प्रतिनिधी योगेश कासट यांची वसंत राठी यांच्यासोबत एका कार्यक्रमात भेट झाली. या भेटीत आदिवासी गावातील भीषण पाणीटंचाई दूर करण्याचे फोरमचे प्रयत्न वसंत राठी यांना समजले. लगेचच त्यांचे सीएसआर प्रमुख काबरा यांनी फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्याशी बोलून प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली. नंतर कंपनीने पाच लाख ३५ हजार रुपये देण्याचे मान्य केले. या रकमेचा धनादेश किशोर राठी यांनी फोरमच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. यापूर्वीही अ‍ॅडव्हान्स एन्झाईम्सने पेठ तालुक्यातीलच कोळुष्टी या गावाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी आर्थिक योगदान दिले होते हे विशेष. त्या वेळी फोरमचे काम बघून अजून काही गावांना कंपनीच्या सीएसआर योजनेंतर्गत मदत करू, असे आश्वासन राठी बंधूंनी दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली.

पाच गावातील कामे प्रगतिपथावर

फोरमच्या कामात जलतज्ज्ञ प्रशांत बच्छाव, यशपाल मोरे हे पाण्याची जागा शोधून देतात. गावकरी श्रमदानातून विहीर खोदणे, चर खोदणे अशी कामे करतात. विहिरीच्या जागी वीज जोडणीची सोय ग्रामपंचायत करते. तर प्रकल्पाच्या कार्यवाहीची जबाबदारी फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड, डॉ. पंकज भदाणे, जीवन सोनवणे, तालुका समन्वयक रामदास शिंदे, संदीप बत्तासे, विजय भरसट तसेच ग्रामसेवक, सरपंच घेतात. आजवर १७ गावांचा पाणीप्रश्न फोरमने सोडवला आहे. पाच गावांतील कामे प्रगतिपथावर आहेत. अ‍ॅडव्हान्स एन्झाईम्सच्या सहकार्याने या शृंखलेत आता २३व्या गावाची पाण्यासाठी वणवण थांबणार आहे.