पर्यावरण संवर्धनासाठी दर वर्षी देशात आयोजित केल्या जाणाऱ्या किर्लोस्कर वसुंधरा आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास पुणे येथे सुरुवात झाली.  या वर्षी जगभरातून आलेल्या साडेतीन हजार छायाचित्रांमधून नाशिकचे वन्य जीव छायाचित्रकार आनंद बोरा यांनी सुरगाणा तालुक्यात पाण्यात पोहत असलेल्या बिबटय़ाच्या काढलेल्या छायाचित्राला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

पुण्यातील बालगंधर्व कला भवन येथे झालेल्या सोहळ्यात बंगरूळु येथील आंतराष्ट्रीय छायाचित्रकार गणेश शंकर यांच्या हस्ते प्रा. आनंद बोरा यांना पारितोषिक देण्यात आले. पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी व्यासपीठावर वीरेंद्र चित्राव, अविनाश मंजुल, नल्ला मुथू आदी उपस्थित होते. प्रा. बोरा यांना नुकताच ‘सेन्चुअरी आशिया’च्या आंतरराष्ट्रीय पारितोषिकासह या वर्षी रावल वन विभाग, ठाणे महापौर, अपेक, डीसीपी आदी राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिकदेखील मिळाले आहे. प्रा. बोरा हे गेल्या दहा वर्षांपासून नाशिकच्या बिबटय़ांवर अभ्यास करीत असून लवकरच त्यांचे पुस्तकही प्रकाशित होणार आहे.