News Flash

दहाव्या रणजी सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज

अनंत कान्हेरे मैदानावर होणारा रणजी सामना नाशिककरांना मोफत पाहता येणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्राच्या संघाला आजपर्यंतच्या सामन्यात अनुकूल ठरलेले येथील अनंत कान्हेरे मैदान शुक्रवारपासून सौराष्ट्रविरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात पुन्हा एकदा महाराष्ट्राला साथ देईल काय? याची उत्सुकता नाशिककरांमध्ये आहे. अ गटातील या सामन्यासाठी अनंत कान्हेरे मैदान सज्ज झाले असून सुमारे सात हजार क्रिकेटप्रेमी सामन्याचा आनंद घेऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

हिरवळीने युक्त अशा कान्हेरे मैदानाभोवती प्रेक्षक गॅलरीची उभारणी करण्यात आल्याने त्याचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. रणजी सामन्याच्या बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी महाराष्ट्राला हा सामना जिंकणे अधिक गरजेचे आहे. या मैदानाने महाराष्ट्राला आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये चांगली साथ दिली आहे. आतापर्यंत महाराष्ट्राने या मैदानावर नऊ रणजी सामने खेळले असून त्यापैकी तीन सामन्यांमध्ये पहिल्या डावातील आघाडीचे गुण वसूल केले आहेत. तर तामिळनाडू, विदर्भ, झारखंड या संघांना पराभूत केले आहे. भारतीय अ संघाकडून न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेला अंकित बावणे या सामन्यात महाराष्ट्राच्या संघाची धुरा सांभाळणार आहे. अनुभवी अष्टपैलू केदार जाधवही खेळणार असल्याने या हंगामात काहीशी दुबळी झालेली महाराष्ट्राच्या संघाची फलंदाजी बळकट झाली आहे.  त्यातच नाशिककर सत्यजित बच्छाव घरच्या प्रेक्षकांसमोर आपली कामगिरी उंचाविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करणार असल्याने हा सामना रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. सौराष्ट्रकडून जयदेव उनाडकट हा ओळखीचा चेहरा असल्याने नाशिककरांकडून त्यालाही प्रतिसाद मिळेल.  सामन्यासाठी महाराष्ट्र आणि सौराष्ट्र दोन्ही संघांचे आगमन झाले आहे. नाशिकच्या थंड हवामानात उत्साहवर्धक कामगिरी करण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत. त्यांचा उत्साह तसूभरही कमी होऊ नये, याकरिता जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वतोपरी काळजी घेतली आहे. मैदानावरील खेळाडूंना प्रेक्षकांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी मैदानाभोवती जाळीची व्यवस्था करण्यात आली आहे.

नाशिककरांसाठी मोफत प्रवेश

अनंत कान्हेरे मैदानावर होणारा रणजी सामना नाशिककरांना मोफत पाहता येणार आहे. याआधीच्या रणजी सामन्यांनाही नाशिककरांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी करून रणजी सामन्यांना गर्दी होत नाही, हा समज खोटा ठरविला होता. त्याचीच पुनरावृत्ती या सामन्यातही होण्याची आशा जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आहे. केदार जाधव, जयदेव उनाडकट, अंकित बावणे, स्थानिक सत्यजित बच्छाव अशी नावे क्रिकेटप्रेमींच्या परिचयाची असल्याने त्यांचा खेळ पाहण्यासाठी नाशिककर नक्कीच गर्दी करतील. क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देताना नाशिककरांनी आपली सभ्यतेची परंपरा पाळण्याचे आवाहनही संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2018 1:03 am

Web Title: ananta kanhere ground ready for the tenth ranji match
Next Stories
1 कळवणच्या द्राक्षबागेची हॉलंडच्या व्यापाऱ्यांकडून पाहणी
2 युवा रंगकर्मीच्या सळसळत्या उत्साहाचा अंतिम फेरीत आविष्कार
3 विद्यार्थ्यांच्या उत्सुकतेचे विज्ञान प्रदर्शनातून निराकरण
Just Now!
X