बुधवारी महापालिके च्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला. प्राणवायूवर असलेले काही रुग्ण बरे होऊन त्यांना दोन-तीन दिवसात घरी सोडण्यातही येणार होते. परंतु, त्याआधीच दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याने शोकमग्न असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून प्रशासन आणि भेट देण्यास येणाऱ्या लोकप्रतिनिधींविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला.

शहराच्या कथडा भागात महापालिके चे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आहे. करोना संकट सुरू झाल्यापासून या रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोना रुग्णसंख्या वाढू लागल्यापासून रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांच्यावरील कामाचा ताणही वाढत गेला. त्यातच काही दिवसांपासून प्राणवायू, रेमडेसिविर इंजेक्शनता तुटवडा निर्माण झाल्याने त्याअनुषंगाने उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांनाही प्रशासनापासून रुग्णांच्या नातेवाईकांना तोंड द्यावे लागत होते. प्राणवायूवर असलेल्या काही रुग्णांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने त्यांना लवकरच घरीही सोडण्यात येणार होते. बुधवारी प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या टाकीतून गळती झाल्याने सर्वच चित्र बदलले. रुग्णांना डोळ्यादेखत अक्षरश: तडफडून मरण येत असल्याचे पाहण्याची वेळ त्यांच्या नातेवाईकांवर आली. अचानक घडलेल्या या परिस्थितीने त्यांच्यावर संकट कोसळले. रुग्णाकडे पाहावे की स्वत:ला सावरावे असे झाले.

ही परिस्थिती असताना घटनेची पाहणी करण्यासाठी थोड्याच वेळात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि राजकीय मंडळींची रीघ लागली. त्यांना पाहताच रुग्णांच्या नातेवाईकांच्या संतापाचा कडेलोट झाला.

काही जण उघडपणे आपला रोष व्यक्त करू लागले. या सर्व मंडळींनी याआधीच प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थेकडे नीट लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती, अशी रुग्णांच्या नातेवाईकांची भावना होती. त्यामुळे पोलिसांना रुग्णांच्या नातेवाईकांची समजूत घालणे भाग पडले. परंतु, एक राजकीय नेता गेला की दुसरा येत गेल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या संतापात भर पडत होती.

राज्य शासन आणि महापालिके च्या वतीने रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आल्याचे काही जणांनी नातेवाईकांच्या लक्षात आणून दिले. त्यावर या मदतीमुळे आमचा माणूस परत येणार आहे काय, असा संताप त्यांच्याकडून व्यक्त के ला गेला. पोलीस तसेच रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांकडून, कर्मचाऱ्यांकडून नातेवाईकांना धीर देण्याचा प्रयत्न वारंवार के ला जात होता. परंतु, तरीही काही जण आक्रोश करतच आपल्या भावना व्यक्त करत होते.