कर्मचाऱ्यांना मारहाण, अतीदक्षता विभागातही गोंधळ; भाजप नगरसेविके च्या भावाच्या मृत्यूनंतरची घटना

नाशिक : भाजप नगरसेविका प्रियंका घाटे यांचे भाऊ रोशन घाटे यांचे सोमवारी रात्री मुंबई नाका परिसरातील एचजीसी मानवता कर्करोग रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर संतप्त जमावान रुग्णालयात गोंधळ घातला. कर्मचाऱ्यांना मारहाण, वाहनाची तोडफोड,  डॉक्टरांना शिवीगाळ करण्यात आली. रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याचा आयएमए संघटनेसह डॉक्टरांनी निषेध करीत दोषींवर कठोर कारवाई आणि रुग्णालयांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली.  तोडफोडीच्या घटनेशी आपला संबंध नसल्याचा दावा घाटे कुटुंबियांनी के ला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

महिनाभरापासून शहरात करोनाचा उद्रेक झाला असून रुग्णसंख्या इतकी वाढली की, एकाही रुग्णालयात खाट मिळत नाही. औषधे, प्राणवायूचाही तुटवडा आहे. बिकट स्थितीत आरोग्य यंत्रणा सेवा देत असताना खासगी रुग्णालये, डॉक्टर, कर्मचारी लक्ष्य होऊ लागल्याचे चित्र आहे. देयकाच्या कारणावरून सातपूर औद्योगिक वसाहतीतील सुशिला रुग्णालयातील डॉक्टरला सोमवारी दुपारी मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेची चर्चा थांबते न थांबते तोच रात्री मानवता रुग्णालयात दुसरी घटना घडल्याने वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरली आहे. मयत रोशन घाटे हे आंबेडकरी चळवळीतील नेते किशोर घाटे यांचे पुत्र तर भाजप नगरसेविका प्रियंका घाटे यांचे बंधू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना मानवता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री त्यांचे निधन झाले. यामुळे संतप्त नातेवाईक, समर्थकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. त्यातून अतिदक्षता विभागही सुटला नसल्याचे रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राज नगरकर यांनी सांगितले. या घटनेचे संपूर्ण चित्रीकरण सीसी टीव्हीत आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देत दोषींवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केल्याचे डॉ. नगरकर यांनी नमूद केले.

आयएमए संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेतली. करोना रुग्णालय आणि स्थानिक पोलीस ठाणे यांच्यात समन्वय साधण्यासाठी व्यवस्था करण्यास मान्यता देण्यात आल्याचे आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ. हेमंत सोननीस यांनी सांगितले. भयमुक्त वातावरणात काम करता येईल, असे आश्वासन मिळाले. त्यामुळे भ्याड हल्ल्यांना न घाबरता करोना रुग्णालयात रुग्ण सेवा सुरू ठेवणार येणारआहे.

डॉक्टरांवर कारवाईची मागणी

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रोशन घाटे यांचा मृत्यू झाल्याची तक्रार कुटुंबियांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केली. चुकीचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आपण रुग्णालयात असतांना कोणतीही घटना घडली नव्हती. पार्थिव ताब्यात घेऊन पहाटे तीन वाजता अंत्यविधी करण्यात आले. नंतर रुग्णालयात तोडफोड झाली. ती कुणी केली, याबद्दल आपल्यासह कुटुंबियांना कोणतीही माहिती नसल्याचे किशोर घाटे यांनी सांगितले. नगरसेविका प्रियंका घाटे या सकाळी नाशिक शहरात आल्या. त्यांचे आणि भाजपचे नाव उपरोक्त घटनेशी जोडणे अयोग्य आहे. चुकीचे उपचार करणारे हे रुग्णालय बंद करण्याची मागणी कुटुंबियांनी केली.