ऑनलाइन शिक्षण बंद करण्याचा व्यवस्थापनाचा इशारा

नाशिक : नव्या शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहे, तरीही शाळांकडून शुल्क भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे.  यंदाच्या शैक्षणिक शुल्काचा पहिला हप्ता १४ ऑगस्टपर्यंत न भरल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबविण्याचा इशारा येथील इंग्रजी माध्यमाच्या अशोका युनिव्हर्सल शालेय व्यवस्थापनाने दिला आहे. याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी संतप्त पालक शाळेत गेले असता व्यवस्थापनाच्या ताठर भूमिकेमुळे त्यांना आल्या पावली परत फिरावे लागले.

ऑगस्ट महिन्यापासून पालकांकडे शुल्क भरण्याचा तगादा  व्यवस्थापनाकडून लावला आहे.  याबाबत शाळेकडून पालकांना पत्र देण्यात आले. पत्रात करोनामुळे आलेली आर्थिक मंदीचे कारण देत ऑनलाइन पोर्टलमार्फत शुल्क भरणे, ते भरण्यासाठी हप्त्याच्या पर्याय देणे असे सांगितले गेले आहे.   शिक्षक-पालक संघाने १५ टक्के शुल्क वाढीला मान्यता दिली असली तरी यंदा शुल्कात वाढ केलेली नाही याकडे लक्ष वेधताना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार, शाळा देखभाल खर्च करण्यासाठी पहिल्या दोन हप्त्यातील शुल्क १४ ऑगस्टपर्यंत भरा, अशी सूचना पत्रात करण्यात आली आहे. शुल्क न भरल्यास १५ पासून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण थांबविण्याचा इशारा व्यवस्थापनाने दिला आहे. यंदा करोनामुळे अनेकांच्या हातातील काम गेले आहे. आर्थिक उत्पन्नावर याचा विपरीत परिणाम झाला आहे. शाळा आपल्या भूमिकेवर ठाम आहे. शाळा ऑनलाइन शिक्षणाचा गवगवा करत आहे. वास्तविक ४५ मिनिटांच्या तासिकेत बऱ्याचदा संपर्क जातो. आवाज ऐकू येत नाही. मोजक्या १०-१५ मिनिटात शिकवले जाते. याला अभ्यास म्हणायचा का, यासाठी एक लाख रुपये वार्षिक शुल्क भरायचे का, असे प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत.

शुल्क कमी होणे अशक्य

पालकांच्या अडचणी लक्षात घेता त्यांना शुल्क भरण्यासाठी टप्प्यांची मुदत वाढवून दिली आहे. यंदा १५ टक्के  शुल्कवाढ अपेक्षित होती. परंतु, ती केली नाही. शाळा बंद असली तरी  शिक्षकांचे पगार आणि अन्य खर्च आहेत. तीन महिन्यांपासून शिक्षकांना ५० टक्के  पगार दिला जात आहे. सर्वाच्या अडचणी लक्षात घेता शुल्कात कुठलीही कपात होणार नाही.वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने शासनाच्या निर्णयावर स्थगिती दिली आहे. आम्ही कोणाचा अनादर करत नाही, असे अशोका युनिव्हर्सल संस्थेचे सचिव  श्रीकांत शुक्ल यांनी सांगितले.