16 January 2019

News Flash

अनिरुद्ध अथनींची अमेरिकेत २४ तासांची यशस्वी धाव

नॉर्थ कॅरोलिना येथे दोन जून रोजी ‘ब्लॅक माऊंटन मॉन्स्टर’ या २४ तास धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

रॉकवूड येथील शर्यतीत १५१.१५ कि.मी.चे अंतर कापत दुसरा क्रमांक

एक क्षणही न थांबता २४ तास सतत धावत राहण्याची कामगिरी येथील अनिरुद्ध अथनी यांनी अमेरिकेतील ‘ओझोर एन्डय़ुरन्स चॅलेंज’ शर्यतीत केली आहे. नाशिकमधील अनेक धावपटूंना मार्गदर्शन करणारे आणि यापूर्वी अनेक मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतलेल्या अथनी यांनी अमेरिकेतील शर्यतीत सतत २४ तास धावत १५१.१५  किलोमीटर अंतर कापले आणि दुसरा क्रमांक गाठत यशाची मोहोर उमटवली.

नॉर्थ कॅरोलिना येथे दोन जून रोजी ‘ब्लॅक माऊंटन मॉन्स्टर’ या २४ तास धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत सहभागी होण्यासाठी अनिरुद्ध अमेरिकेला पोहचले, परंतु शर्यतीच्या दोन दिवस आधी अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला वादळी पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शर्यत पुढे ढकलण्यात आली. आपली सर्व तयारी वाया जाणार म्हणून अनिरुद्ध कमालीचे निराश झाले. त्याच दरम्यान त्यांना फेसबुकवर अशाच प्रकारची शर्यत अमेरिकेतीलच रॉकवूड येथे होत असल्याची माहिती मिळाली. नॉर्थ कॅरोलिनापासून ७०० किलोमीटर दूर असलेल्या या परिसरालाही पावसाने झोडपून काढले असले तरी शर्यत होणार होती. अनिरुद्ध यांनी आयोजकांशी संपर्क साधला. ऐनवेळी प्रवेश देण्यास आयोजक राजी नव्हते. प्रवेश दिला तरी तुम्हांला पदक देता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

तीन महिने केलेला सराव वाया जाऊ नये म्हणून त्यांनी शर्यतीत सहभाग घेण्याचा निश्चय केला.  एका नातलगाच्या मदतीने ७०० किलोमीटरचा पल्ला पार करून शर्यतीच्या आदल्या दिवशी ते रॉकवूडला पोचले. अशा प्रकारच्या शर्यतीसाठी तीव्र चढ-उतार, जंगल, खडकाळ, माती अश्या प्रकारच्या मार्गावरून धावावे लागते. तेही चोवीस तास. ही शर्यत अनिरुद्ध यांनी दुसरा क्रमांक गाठत पूर्ण केली.

आपल्या वडिलांकडून धावण्याची प्रेरणा घेणाऱ्या अनिरुद्ध यांची पुढची पिढी मुलगा धनंजय आणि मुलगी आनंदी, पत्नी नृत्यांगणा सुमुखी अथनी हेही धावण्यासाठी  अनिरुद्ध यांच्याबरोबर मैदानात असतात.

ओळखनिर्मिती पदकापेक्षा समाधानकारक

धावण्याच्या सरावाबरोबर स्वतच्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची साधना आपण अखंड करत असतो. भूतकाळ आणि भविष्यकाळातील शर्यतीपेक्षा प्रत्येक वेळी मीच मला नव्याने अधिक ओळखू लागतो हे समाधान कोणत्याही पदकापेक्षा महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया अनिरुद्ध अथनी यांनी व्यक्त केली. नाशिक हे धावपटूंचे केंद्र व्हावे यासाठी काम करीत राहण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

First Published on June 13, 2018 1:13 am

Web Title: aniruddha athani 24 hours running in america