महापालिकेच्या स्थायी सभापती पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. सदस्य नियुक्ती नियमाला धरून नसल्याचा आक्षेप घेत या निवडणुकीवर विरोधी शिवसेनेने बहिष्कार टाकून न्यायालयात दाद मागितली होती. त्यावर दोन आठवडय़ांनी सुनावणी होणार आहे. करोनामुळे देशासह महाराष्ट्रात टाळेबंदी सुरू असताना भाजपने न्यायालयात धाव घेतली. सत्तेचा किती सोस आहे हेच दाखवून दिल्याची टीका सेनेने केली आहे.

महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या निर्देशानुसार मार्चमध्ये जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या उपस्थितीत झाली होती. या निवडणुकीसाठी भाजपतर्फे गणेश गीते हे एकमेव उमेदवार होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचे सदस्य उपस्थित होते; परंतु सेनेने या प्रक्रियेवर बहिष्कार टाकला.

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर याची माहिती बंद लिफाफ्यात न्यायालयास सादर करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात सेनेने स्थायी सदस्य नियुक्तीला आव्हान दिले. या याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी, असा भाजपचा प्रयत्न होता; परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर, न्यायालयीन कामकाजावर मर्यादा आल्याने ही तातडीची याचिका ठरू शकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले होते; पण नंतरही भाजपची धडपड सुरू राहिल्याचे गीते यांनी न्यायालयात नव्याने याचिका दाखल केल्यामुळे अधोरेखित झाले. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.

निवडणूक प्रक्रियेच्या माहितीचे अवलोकन करत न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करावा, असे आदेश दिल्याचे भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी सांगितले. या निर्णयामुळे सत्याचा अखेर विजय झाल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

शहराच्या विकासात शिवसेनेने अडथळे आणले. करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी स्थायीच्या माध्यमातून शहर विकासाची कामे मार्गी लावता आली असती. उर्वरित काळात भाजप स्थायीच्या माध्यमातून चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार, असे पाटील यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. न्यायालयाचा निकाल हंगामी असून दोन आठवडय़ांनी सेनेच्या याचिकेवर सुनावणी होईल. करोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करतात; पण सत्तेच्या हव्यासामुळे भाजपची मंडळी न्यायालयात धाव घेतात. यामुळे भाजप सत्तेविना राहू शकत नाही, त्यांना सत्तेचा किती सोस आहे, हे यावरून उघड झाल्याचा टोला बोरस्ते यांनी लगावला.