आरोग्य विभागाचा दावा

नाशिक : जिल्ह्य़ातील माता मृत्यूचा वाढता आलेख पाहता जिल्हा आरोग्य विभाग, प्रशासन आणि टाटा कन्सल्टन्सी यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या ‘मातृत्व अ‍ॅप’मुळे माता मृत्यूवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. सांघिक प्रयत्न आणि विविध शासकीय उपक्रमांमुळे संवेदनशील असलेल्या त्र्यंबक भागात यंदा एकही माता मृत्यू झालेला नाही. या पाश्र्वभूमीवर लवकरच अ‍ॅपच्या माध्यमातून नवजात बालक, अर्भक तसेच शिशुंसाठी लसीकरण आणि अन्य वैद्यकीय सेवा देण्यासाठी कामाची आखणी करण्यात येणार आहे.

त्र्यंबकेश्वर तालुक्यात २०१४-२०१५ मध्ये १३२ पेक्षा अधिक, तर २०१५-२०१६ मध्ये १७५ मातांचा मृत्यू झाला. माता मृत्यूचा दर, त्याची कारणे याचा अभ्यास करताना आरोग्य विभागाने टाटा कन्सल्टन्सीच्या सहकार्याने २०१६ मध्ये अंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्कालीन विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘मातृत्व अ‍ॅप’ सुरू करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा, आरोग्यसेविकांच्या भ्रमणध्वनीत अ‍ॅपची सुविधा झाल्याने गरोदर मातांची पहिल्या महिन्यापासून माहिती संकलनास सुरुवात झाली. गरोदर मातेचे वजन, उंची, हिमोग्लोबीन, रक्तदाब, मधुमेह अशी माहिती या माध्यमातून मिळाल्याने

अतिजोखीम, मध्यम जोखीमच्या माता आणि सर्वसामान्य माता या प्रकारे वर्गीकरण करून गरोदर मातांना गरजेनुसार लोह, रक्तवाढीच्या गोळ्या देण्यात आल्या. खासगी रुग्णालयात जननी सुरक्षा निधीचा वापर करीत गरोदर मातांची सोनोग्राफी केल्याने बाळाचे ठोके, त्याला असलेले व्यंग आणि अन्य स्थिती लक्षात घेतल्याने बाळंतपणातील धोके टाळता आले. आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे २०१६-२०१७ मध्ये अंबोली केंद्रात एकाही मातेचा मृत्यू झाला नसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांनी दिली. २०१७-२०१८ मध्ये हा अहवाल अंबोलीच्या बाबतीत निरंक राहिला. अंबोली प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या १३ उपकेंद्रात हा उपक्रम राबविल्यानंतर पुढील टप्प्यात त्र्यंबक, नाशिक, देवळा, चांदवड या तालुक्यांमध्ये मातृत्व अ‍ॅपच्या वापरास सुरुवात झाली. मानव विकास शिबिरांवर भर देत गरजू महिलांना लोहयुक्त गोळ्या, त्यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याने गरोदरपणातील जोखीम टाळता येत असल्याने माता मृत्यूवर नियंत्रण आणण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. गेल्यावर्षी संपूर्ण जिल्ह्य़ात मातृत्व अ‍ॅप अंतर्गत काम सुरू करण्यात आले.

कळमुस्तेच्या गरोदर मातेला जीवदान

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते येथील गरोदर माता अती जोखमीची होती. ही माहिती समजल्यानंतर आरोग्यसेविका, आशा कर्मचारी यांच्या माध्यमातून तिला वेळोवेळी औषधोपचार देण्यात आले. प्रसूतीची तारीख जवळ येत असतांना तिला जिल्हा रुग्णालयात दाखल होण्याविषयी सुचविण्यात आले. त्याच दरम्यान काही कौटुंबिक कारणामुळे ती इगतपुरीला निघून गेली. त्यावेळी त्र्यंबकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी इगतपुरी येथील वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्यसेविकेला तिची माहिती दिली. दोन-तीन दिवस पाठपुरावा केल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी बाळ कमी वजनाचे असल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. महिनाभराच्या उपचारानंतर बाळ आणि नवजात माता सुखरूप घरी परतले.