सोहळ्यात संजय राऊत आणि छगन भुजबळ यांची एकमेकांवर स्तुतिसुमनांची उधळण

देशाच्या राजधानीत बहुतांश राज्यांची सदने आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र सदन सर्वाधिक उठून दिसते, असे प्रशस्तिपत्रक खा. संजय राऊत यांनी दिले. इतकेच नव्हे तर, स्थानिक लोकप्रतिनिधींनी विकासकामे करताना भुजबळ यांचे मार्गदर्शन घ्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. तर खुद्द भुजबळ यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात राऊत यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगून त्यांचे कौतुक केल्याचे येथे पाहण्यास मिळाले.

त्र्यंबक रस्त्यावर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आणि ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भुजबळांवर टीका करणारे राऊत भुजबळांचे गोडवे गाताना दिसल्याने हा सोहळा जणू राऊत आणि भुजबळ यांचा कौतुक सोहळाच असल्याचे चित्र या वेळी निर्माण झाल्याचे दिसून आले.

भुजबळांचे कौतुक करताना राऊत यांनी विरोधी पक्ष नेत्यांना चिमटे काढले. सत्तेपेक्षा विरोधात राहून फायदा होतो, हे सध्याच्या विरोधी पक्ष नेत्यांना समजावून सांगण्याची गरज आहे. यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल, असा टोला त्यांनी लगावला.

विकासासाठी सर्वानी एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदन सर्वाधिक उठून दिसणारे सदन आहे. असे काम करणारे भुजबळ हे एकमेव नेते असल्याचे राऊत यांनी नमूद केले.

राऊतांकडून झालेल्या कौतुकाची परतफेड करण्यात भुजबळांनीही मग कोणतीही कसर सोडली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात ज्याप्रमाणे आचार्य अत्रे आणि त्यांचा मराठा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच महाविकास आघाडीचे सरकार उभे करण्यासाठी राऊत यांनी काम केल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्य़ात विकासकामे पुढील काळातही सुरू राहतील असे नमूद केले. कुठल्याही विकासकामांना आपला विरोध नाही. तज्ज्ञांची मदत घेऊन प्रकल्प, योजना राबविल्या गेल्या पाहिजे. कारण, नागपूरची मेट्रो अडचणीत सापडली. मुंबईची मोनोरेल फसली. त्यामुळे नाशिकचा विकास करतांना नाशिकचे सौंदर्य आणि नाशिकपण टिकायला हवे, असे त्यांनी सांगितले. शासनाच्या यंत्रणांमार्फत ग्रामीण भागातील जनतेचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणेची भूमिका महत्त्वाची आहे. जिल्हा परिषद इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

माजी राज्यमंत्री दादा भुसे यांनी जवळपास ४५ कोटींचा हा प्रकल्प उभा राहत आहे. या विभागासाठी भुजबळ यांच्यासारखा मंत्री लाभल्याने एका वर्षांच्या आत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला. या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, खा. हेमंत गोडसे, खा. डॉ.भारती पवार, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावीत, आ. दिलीप बनकर, आ. सरोज अहिरे आदी उपस्थित होते.

जिल्ह्य़ात दीड हजार कोटींची कर्जमाफी

महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीतून नाशिक जिल्ह्य़ात दीड हजार कोटींपेक्षा अधिक कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. गेल्या कर्जमाफीत जिल्ह्य़ात ६५० कोटी रुपये आले. मात्र, प्रत्यक्षात २५० कोटींचे वाटप झाले. त्यामुळे आता दिलेल्या कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जाण्यासाठी लोकप्रतिनिधींनी खबरदारी घ्यावी, अशी सूचना भुजबळ यांनी केली.