अंकाई, साल्हेर-मुल्हेर, धोडप किल्ल्यांच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव

राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी ‘किल्ले वाचवा’ मोहीम हाती घेतली असली तरी जिल्ह्यातील अनेक किल्ल्यांची स्थिती बिकट असून तेथे साधी साफसफाईदेखील होत नाही. या वास्तूंचे योग्य पद्धतीने जतन झाले तर पर्यटक त्याकडे आकर्षित होतील. शहराच्या पर्यटनाला नवीन आयाम लाभेल. पुरातत्त्व विभागाने या अनुषंगाने पावले टाकण्यास सुरुवात केली असून नाशिक विभागातील किल्ले, ऐतिहासिक वास्तू यांची माहिती संकलित केली जात आहे. काही किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यात अंकाई, साल्हेर-मुल्हेर, धोडप किल्ला तसेच नाशिकच्या सुंदर नारायण मंदिराच्या नूतनीकरणाचाही अंतर्भाव आहे.

जिल्हा प्रशासनाचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून त्यांचे कोणत्याही प्रकारे विपणन होत नाही. सर्वाधिक किल्ले वन विभागाकडे असून त्यावरील तटबंदी नामशेष झाली आहे. किल्ल्यांवरील अनेक तळी व टाक्यांमध्ये मुबलक पाणी असून त्याचे व्यवस्थापन नाही. तेथील पर्यावरण संपत्ती नष्ट होण्याचा मार्गावर असून खुलेआम झाडांची कत्तल सुरू आहे. दुसरीकडे, ऐतिहासिक वाडे, किल्ले, मंदिरे परंपरेने वंशजाकडे असले तरी या वास्तूंची अवस्था फारशी वेगळी नाही. त्या काळातील इतिहास सांगणाऱ्या वास्तू सांभाळणे आजच्या पिढीला अशक्य झाले आहे. यातील अनेक ऐतिहासिक वास्तूंचे जीर्णोद्धाराच्या नावाखाली वास्तूचा मूळ गाभा बदलत बांधकाम सुरू असल्याचे काही प्रकार होत आहे. या एकंदर स्थितीवर चिंता व्यक्त होत असल्याने राज्य सरकारने किल्ल्यांच्या संवर्धनाचा मनोदय मांडला आहे. पुरातत्त्व विभागाने मागील चार ते पाच महिन्यांपासून नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर या पाचही जिल्ह्यांतील किल्ल्यांची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली. त्यांचे सर्वेक्षणही केले जात आहे. किल्ला डागडुजीसाठी अपेक्षित खर्च, करावयाचे बदल याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. त्यानुसार मालेगाव येथील गाळणा किल्ल्याचे काम लवकरच सुरू होत असून अंकाई, साल्हेर-मुल्हेर, धोडप तसेच नाशिक येथील सुंदर नारायण मंदिराच्या डागडुजीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले.

उत्तर महाराष्ट्रातील किल्ल्यांची विदारक स्थिती

नाशिकला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. जिल्हय़ात सात तर उत्तर महाराष्ट्रात १२५ हून अधिक शिवकालीन तसेच अन्य किल्ले आहेत. पुरातत्त्व, पर्यटन आणि वन विभाग यांच्या अखत्यारीत हे किल्ले येतात. समृद्ध इतिहास कथन करणाऱ्या किल्ल्यांची सध्या पडझड सुरू असून हा परिसर मद्यपी, टवाळखोरांचा अड्डा बनत आहे. राज्यातील इतर ठिकाणच्या किल्ल्यांपेक्षा उत्तर महाराष्ट्रातील किल्ल्यांची विदारक स्थिती असल्याचे दुर्ग संवर्धनचे राम खुर्दळ यांचे म्हणणे आहे.