अनिकेत साठे

देवळालीतील ७१४ गाई पुण्यात पाठविणार

लष्कराने देशभरातील आपले गाईंचे गोठे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील अशा गोठय़ांमधील जनावरे खरेदी करण्याची तयारी पशुसंवर्धन विभागाने सुरू केली आहे. त्या अंतर्गत देवळालीच्या लष्करी गोठय़ातील केवळ निरोगी जनावरे खरेदी केली जाणार आहेत. सध्या या गोठय़ात ७१४ गायी असून आरोग्य तपासणीअंती निरोगी गाईंचे पुणे येथे स्थलांतरित केल्या जाणार आहेत. या निमित्ताने लष्कराने संकर केलेल्या ‘फ्रिजवाल’ या जादा दूध देणाऱ्या प्रजातीच्या गायी राज्यात प्रथमच उपलब्ध होणार असून या प्रजातीच्या संरक्षणाचे काम पशुसंवर्धन विभाग करणार आहे.

लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर (निवृत्त) यांच्या समितीने सुचविल्यानुसार लष्कराने देशातील सर्व आपल्या ताब्यातील गाईंचे गोठे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागे गोठय़ांवरील खर्च कमी करून लष्करी सज्जता राखण्याकडे अधिक लक्ष देण्याचे कारण असल्याचे सांगितले जाते. लष्करी गोठय़ांमधील पशुधन त्या त्या राज्यात पशुसंवर्धन विभागाला नाममात्र दरात दिले जाणार आहे. या अनुषंगाने संरक्षण मंत्रालय आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग यांच्यात करारनामा झाला. राज्यात लष्कराचे नाशिक (देवळाली कॅम्प), अहमदनगर आणि पिंप्री चिंचवड येथे लष्करी गोठे आहेत. या तिन्ही ठिकाणी एकूण ३२४१ फ्रिजवाल आणि अन्य काही संकरीत गायी आहेत. त्यातील ७१४ गायी देवळाली कॅम्पस्थित लष्करी गोठय़ात आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने नुकतीच या जनावरांची आरोग्य तपासणी केली. विविध नमुने संकलित केले. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर खरेदीची प्रक्रिया पुढे सरकणार या गायींमध्ये काही भाकड, काही दूध देणाऱ्या तर काही वयोवृद्ध आहेत. ११० वासरांचाही त्यात अंतर्भाव आहे. जनावरांना साधारणपणे क्षयरोग (टीबी) आणि तत्सम आजार होतात. पशु संवर्धन विभागाच्या अखत्यारीतील गोठे पुणे जिल्ह्य़ात आहेत. तेथे आधीपासून असणाऱ्या जनावरांना लष्करी गोठय़ातून आणलेल्या जनावरांमुळे आजाराचा प्रार्दुभाव होऊ नये, म्हणून प्रत्येक गायीच्या तपासणीची दक्षता घेण्यात आल्याचे पशु संवर्धन विभागाचे म्हणणे आहे. लष्करी गोठय़ांमधून मोठय़ा संख्येने जनावरे या विभागाच्या गोठय़ात दाखल होतील.

भारतीय लष्कराने चार ते पाच दशकांपूर्वी पंजाबमधील साहिवाल आणि वल्डस्पीन फ्रिजियन या गायींच्या संकरातून ‘फ्रिजवाल’ ही नवीन प्रजाती विकसित केली. कोणत्याही हवामानात वास्तव्य आणि जादा दूध उत्पादन देणारी ही प्रजाती आहे. लष्कराच्या गायी खरेदी करण्यामागे देशात विकसित झालेल्या या प्रजातीचे संरक्षण करण्याचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील लष्करी गोठय़ांमध्ये ३२४१ गाई असून त्यातील बहुतांश गायी या फ्रिजवाल प्रजातीच्या आहेत. प्रति एक हजार रुपये दराने निरोगी गाई खरेदी केल्या जाणार आहेत. गाईंची उत्पादन क्षमता वाढविणे, नवीन प्रजाती विकसित करणे यासाठी दर्जेदार गाईंची गरज असते. अशा गाईंसाठी एक ते दोन लाख रुपये मोजावे लागतात. मात्र लष्कराकडून दर्जेदार गायी खरेदी केल्यामुळे तो खर्च वाचणार आहे.

– डॉ. डी. डी. परकाळे (अतिरिक्त आयुक्त, पशुसंवर्धन विभाग)