News Flash

पत्नीचा खून करून सैन्यदलातील जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न

पती सुनील बावा लष्करात जवान असून तो श्रीनगर येथे कार्यरत आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

नाशिक : पैशांची मागणी पूर्ण होत नसल्याने पत्नीचा खून करून नंतर स्वत:च्या हातावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा प्रकार बुधवारी रात्री पेठ रस्त्यावरील इंद्रप्रस्थनगरीत घडला. पती सुनील बावा लष्करात जवान असून तो श्रीनगर येथे कार्यरत आहे. अलीकडेच तो सुट्टीवर आला आहे. खूनप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी बावा याला अटक केली आहे.

या संदर्भात मुलीचे वडील प्रकाश बावा यांनी तक्रार दिली.

दोन वर्षांपूर्वी चैतालीचा (२३) विवाह सटाणा येथील सुनील बावा (३०) यांच्याशी झाला. त्यांना अडीच महिन्याची मुलगी आहे. बुधवारी रात्री जावयाच्या नातलगाकडून भ्रमणध्वनीवर मिळालेल्या माहितीमुळे चैतालीच्या आई-वडिलांनी इंद्रप्रस्थनगर येथील सिद्धिसागर रो हाऊस येथे धाव घेतल्यानंतर खुनाचा हा धक्कादायक प्रकार उघड झाला.  घराचा दरवाजा आतून बंद होता. आवाज दिल्यानंतर सुनील बावा यांनी दरवाजा उघडला. घरात गेल्यानंतर चैताली निपचित पडलेली होती. त्यावेळी सुनीलच्या हातावर आणि घरात रक्ताचे डाग दिसत होते. या घटनेची माहिती पोलिसांना देऊन आई-वडिलांनी चैतालीला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. तपासल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषित केले. संशयित सुनील बावा हा भारतीय लष्करात जवान आहे. तो श्रीनगर येथे नियुक्त असून दहा दिवसांपूर्वी सुट्टीवर आला आहे. लग्नाआधी त्याने पेठ रस्त्यावर रो हाऊस घेतले होते. लग्नानंतर काही दिवस सुखात गेल्यानंतर त्याच्याकडून चैतालीचा छळ सुरू झाला.

रो हाऊस घेतल्याने वेतनातील बरीचशी रक्कम हप्त्यात जाते. आपल्यावर आई, मोठा भाऊ आणि त्याच्या परिवाराची जबाबदारी असल्याचे सांगून सुनीलने चैतालीकडे माहेरून १० लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता. मुलीचा संसार व्यवस्थित व्हावा, यासाठी कुटुंबीयांनी पाच लाख रुपये जावयाच्या खात्यावर जमा केले होते. तरीदेखील सुट्टीवर आल्यावर तो चैतालीला त्रास देत असल्याने या संदर्भात वडिलांनी पोलिसांच्या महिला सुरक्षा विभागाकडे तक्रार दिली होती. चैतालीला मुलगी झाल्यानंतरही सुनील मुलीला पाहण्यास आला नाही. पैशांची मागणी पूर्ण होत नसल्याने सुनीलने चैतालीचा गळा आवळून खून केल्याची तक्रार वडिलांनी दिली. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2020 2:32 am

Web Title: army jawans attempt suicide after killing wife zws 70
Next Stories
1 माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार ; मालेगाव येथील घटना
2 नाशिकला नावीन्यपूर्ण लष्करी उपक्रम केंद्राची वर्षभरानंतरही प्रतीक्षा
3 स्थायी सभापती निवडणूक स्थगित
Just Now!
X