पेठरोडला १३ बाधित, मालेगावात रुग्णांची संख्या  ६९१

नाशिक : जिल्ह्य़ात करोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत ही संख्या ९८४ झाली असून नाशिक महापालिका हद्दीत ती ११५ वर पोहचली आहे. शहरातील पेठरोड येथे १३ करोनाबाधित आढळले. सोमवारी ५३ वर्षांच्या वाहनचालकानंतर मंगळवारी ५० वर्षांच्या पोलीस कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाल्याने बळींची संख्या सात झाली आहे.  नाशिक ग्रामीणमध्ये १३४ रुग्ण असून मालेगाव महापालिका हद्दीत हा आकडा ६९१ वर पोहचला आहे. जिल्हाबाहेरील ४३ रुग्ण सध्या करोना कक्षात उपचार घेत आहेत.

सोमवारी पेठ रोड येथील करोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील १३ जण करोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. यामध्ये आठ पुरूष आणि पाच महिला आहेत. तसेच मंगळवारी सकाळी वडाळ्यातील मुमताज नगरात करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील ६५ वर्षांच्या महिलेचा करोना अहवाल सकारात्मक आला. शिवाजी वाडीतील किराणा दुकानदाराच्या संपर्कातील ५६ वर्ष आणि ७५ वर्षांच्या महिलेला करोना असल्याचे उघड झाले. पंचवटीतील बळी मंदिर परिसरातील ५० वर्षांच्या पोलीस कर्मचाऱ्याचा अहवाल सकारात्मक आला. यामुळे महापालिका हद्दीत रुग्णांची संख्या ११५ झाली आहे. शहरातील २३ क्षेत्र सध्या प्रतिबंधित आहेत. दरम्यान, नाशिक ग्रामीणमध्येही करोनाचा विळखा पडत असून जिल्हा परिसरात १३४ रुग्ण उपचार घेत आहेत. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ हे तालुके अद्याप करोनामुक्त आहेत. मालेगाव महापालिका हद्दीत ६९१ रुग्ण असून जिल्ह्य़ात ४३ बाहेरील रुग्ण उपचार घेत आहेत.

वाहनचालकाचा मृत्यू

ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात राहणारा ५४ वर्षांचा वाहन चालक कामगारांना पोहचविण्यासाठी चारचाकी वाहनाने उत्तर प्रदेश येथे गेला होता. उत्तर प्रदेशातून परत येत असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला. सर्व पूर्तता करून परतण्यास उशीर झाला. परतीच्या प्रवासात १८ मे रोजी चांदवड परिसरात त्यांना ताप, खोकला आणि श्वसनाला त्रास जाणवू लागला. चांदवड येथील कोविड हेल्थ सेंटर येथे त्यांची तपासणी केली असता दम लागणे, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे समोर आले. त्यांच्या घशातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी घेत जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १९ मे रोजी त्यांचा अहवाल करोना सकारात्मक आला.  जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतांना सोमवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू

मालेगाव येथे कार्यरत पोलीस कर्मचारी भाऊसाहेब माळी (५०) यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाशिक येथे पाच दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल करण्यात आले. नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दोन दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पोलीस असल्याने त्यांना तीन दिवसांपूर्वी मविप्रच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. त्यांच्या संपर्कातील कुटूंबातील चार सदस्यही करोनाबाधित असल्याने त्यांच्यावर मविप्रच्या वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी माळी यांचा मृत्यू झाला.